पुण्यातील जमीन व्यवहार प्रकरणानंतर पार्थ पवारांना मोठा धक्का ; कंपनीला दंडासह भरावी लागणार मोठी रक्कम…


पुणे : पुण्यातील कोरेगाव पार्क येथील 40 एकर जमीन खरेदी प्रकरणामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार चांगलेच अडचणीत आले आहेत. या जमीन व्यवहारात गैरव्यवहार उघडकीस आल्यामुळे तो रद्द झाला आहे. हा व्यवहार रद्द झाल्यानंतर पार्थ पवार यांच्या ‘ॲमेडिया कंपनी’ला आणखी एक मोठा धक्का सहन करावा लागणार आहे.कारण या प्रकरणी कंपनीला मुद्रांक शुल्क आणि दंडासह सुमारे 43 कोटी रुपये भरावे लागणार आहेत.

समोर आलेल्या माहितीनुसार,‘ॲमेडिया कंपनी’ने कोरेगाव पार्क येथील जमिनीचा व्यवहार केला होता. परंतु, हा व्यवहार वादग्रस्त ठरल्याने तो रद्द करण्यात आला. या व्यवहारात मुद्रांक शुल्काची फसवणूक झाल्याचं उघड झालं असून नोंदणी मुद्रांक विभागाने कंपनीला दस्त नोंदणीवेळी बुडवलेले व दस्त रद्द करण्यासाठीचे संपूर्ण मुद्रांक शुल्क भरण्याची सूचना केली आहे. त्यानुसार, कंपनीला सुमारे 43 कोटी रुपये भरावे लागणार आहेत. यात 42 कोटी रुपये मुद्रांक शुल्क आणि त्यावर दोन टक्के दंड यांचा समावेश आहे. त्यामुळे व्यवहार रद्द झालेला असतानाच पार्थ पवार यांना मोठा आर्थिक फटकाही सहन करावा लागणार आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वतः हा व्यवहार रद्द करण्यात आल्याचे जाहीर केले. या पार्श्वभूमीवर, पुण्याच्या नोंदणी मुद्रांक विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितलं की, व्यवहार रद्द करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून ती लवकरच पूर्ण होईल.दरम्यान महाराष्ट्र मुद्रांक अधिनियमानुसार 5 टक्के मुद्रांक शुल्क, स्थानिक संस्था कर एक टक्का व मेट्रो कर एक टक्का, असे एकूण सात टक्के मुद्रांक शुल्क आणि त्यावर दंड कंपनीला भरावा लागणार आहे. तसंच, कमी पडलेले मुद्रांक शुल्क व दंड मुद्रांक जिल्हाधिकाऱ्यांकडे जमा करून दस्त योग्य मुद्रांकित करणं आवश्यक आहे.

दरम्यान, या जमीन घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यांची समिती स्थापन करण्यात आली असून या समितीला आपला अहवाल सादर करण्यासाठी एक महिन्याची मुदत देण्यात आली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!