काँग्रेसला मोठा धक्का;ऐन निवडणुकीत 2 बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश

पुणे:राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. 15 जानेवारीला मतदान पार पडणार असून 16 जानेवारीला निकाल जाहीर होणार आहे. निवडणुकीच्या तोंडावर राजकीय समीकरणे बदलताना दिसत आहेत. अशातच आता नांदेडमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसला. दोन बड्या नेत्यांनी भाजपात प्रवेश केला आहे.

काँग्रेसच्या माजी महापौर जयश्री पावडे आणि माजी उपमहापौर सतीश देशमुख यांच्यासह मनसे जिल्हाध्यक्ष विनोद पावडे यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला आहे. या तिन्ही नेत्यांनी आज महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. या पक्षप्रवेशानंतर नांदेड मध्ये काँग्रेसची समीकरणे बदलली असून भाजपची ताकद वाढली आहे.
पक्षप्रवेशानंतर जयश्री पावडे आणि सतीश देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, विकासाच्या दृष्टिकोनातून आणि जनतेची काम होण्यासाठी आम्ही भाजपमध्ये प्रवेश केला आहे. राज्यात आणि केंद्रात भाजपचे सरकार आहे, आमचे नेते सुद्धा भाजपमध्ये गेले आहेत. त्यामुळे आम्ही भाजपमध्ये प्रवेश केला.काँग्रेस पक्ष चांगला आहे. मात्र आम्ही सुरुवातीपासून भाजपाच्या नेत्यांच्या संपर्कात आहेत. असे त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे ऐन निवडणुकीत काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे
