अनिल अंबानींना मोठा धक्का ;आणखी ११२० कोटींची मालमत्ता जप्त

पुणे : प्रसिद्ध उद्योगपती अनिल अंबानी यांच्यामागे ईडीचा ससेमिरा कायम असून त्यांना धक्क्यावर धक्के बसत आहेत.आता येस बँक घोटाळा प्रकरणात त्यांची ११२० कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे.

रिलायन्सचे अनिल अंबानी यांना येस बँक घोटाळा त्यांना भोवला आहे. रिलायन्स होम फायनान्स आणि रिलायन्स कमर्शिअल फायनान्स या रिलायन्स अनिल अंबानी समुहाशी संबंधीत १८ मालमत्तांवर टाच आली आहे. सक्तवसुली संचालनालयाने या संस्थांशी संबंधित मुदत ठेवी, बँकेतील रोकड आणि विविध कंपन्यांतील समभाग अशी एकूण ११२० कोटींची मालमत्ता जप्त केली आहे.

याप्रकरणी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने R Com, अनिल अंबानी आणि इतरांवर घोटाळ्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. संचालनालय सुद्धा याप्रकरणी चौकशी करत आहे.

या जप्त केलेल्या मालमत्तांमध्ये रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर लि.च्या अंधेरीतील व्यावसायिक इमारतींसह बॅलार्ड इस्टेट येथील रिलायन्स सेंटर, सांताक्रूझ येथील आलिशान सदनिका, अतिथीगृह अशा सात, रिलायन्स पॉवर लि. च्या दोन, रिलायन्स व्हॅल्यू सर्व्हिस प्रा. लि.चे चेन्नई येथील २३१ भूखंड तसेच सात सदनिका अशा नऊ मालमत्तांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे.
या नवीन कारवाईमुळे शेअरमध्ये पुन्हा घसरण दिसली आहे. रिलायन्सच्या कंपन्यांवरील कर्ज कमी झाल्याने गुंतवणूकदारांचा विश्वास वाढत असतानाच नवीन धडाधड कारवाईमुळे गुंतवणूकदारही धास्तावले आहेत.
