तुकाराम मुंढेच्या आदेशानंतर मोठी कारवाई!सांगली जिल्हा परिषदेतील 13 शिक्षकासह एक कर्मचारी निलंबित

पुणे : राज्याच्या प्रशासनातील धडाकेबाज आयएएस अधिकारी तुकाराम मुंडे यांनी दिव्यांग कल्याण विभागाचा सचिव म्हणून पदभार घेतल्यापासून कामाचा धडाका सुरूच ठेवला आहे.त्यांनी राज्यातील सर्व प्रशासकीय विभागातील दिव्यांग प्रमाणपत्रांची चौकशी आणि युडीआयडी कार्ड फेरतपासणीचा आदेश देत, त्याचे अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या पार्श्वभूमीवर आता सांगली जिल्हा परिषदेत मोठी कारवाई झाली आहे.

सांगली जिल्हा परिषदेमधील 13 शिक्षक आणि एका कर्मचाऱ्याला वारंवार सूचना देऊन देखील दिव्यांग ओळखपत्र व युडीआयडी कार्ड सादर न केल्याने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांनी ही कारवाई केल्याने खळबळ उडाली आहे.बोगस दिव्यांग प्रमाणपत्राचे आधारे नोकरी आणि सवलत मिळवल्याचे प्रकार समोर आल्यानंतर ही कारवाई करण्यात येत आहे.
आपल्या धडाकेबाज निर्णयासाठी तुकाराम मुंढे ओळखले जातात. त्यांनी दिव्यांग कल्याण विभागाचा कारभार हाती घेतल्यापासून, ते दिव्यांग कल्याण विभागातील कामांवर विशेष लक्ष देत आहेत. दिव्यांगांना न्याय मिळावा या भूमिकेत ते आहेत. यातूनच त्यांनी राज्यातील सर्व प्रशासकीय विभागांना त्यांच्या विभागातील दिव्यांगांची, त्यांच्याकडील प्रमाणपत्रांची, युडीआयडी कार्डची फेरतपासणी करून, त्याचा अहवाल सादर करण्याचा आदेश दिला आहे.

दरम्यान तुकाराम मुंढे यांच्या या आदेशाला फक्त दोन प्रशासकीय विभागाने प्रतिसाद दिला आहे. आता ग्राम विकास विभागाकडून कार्यवाही सुरू झाली आहेत. या पार्श्वभूमीवर सांगली जिल्हा परिषदेतील 13 शिक्षक आणि कर्मचाऱ्यावर मोठी कारवाई करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.