मोठी दुर्घटना! दादर स्थानकाच्या पार्किंगमध्ये दुचाकी पेटल्या ; 15 हुन अधिक वाहने जळून खाक

मुंबई : दादर स्थानकाच्या शेजारी असलेल्या दुचाकी पार्किंगच्या वाहनांना अचानक आग लागल्याची माहिती समोर आली आहे.या आगीत पंधराहून अधिक वाहने जळून खाक झाल्याने मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने या आगीत कोणीही जखमी झालेले नाही. दरम्यान या आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे.

दादर टर्मिनसच्या फलाट क्रमांक 14 शेजारील भिंती पलीकडील दुचाकीना आग लागल्याची माहिती समोर आली. या घटनेची माहिती मिळताच तातडीने अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले.त्यांनी आग विझवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले. तसेच या आगीमुळे लोकल ट्रेनच्या वाहतुकीला कोणताही अडथळा आला नसल्याची माहिती समोर आली आहे. आगीवर तातडीने नियंत्रण मिळवता आल्याने कोणतीही दुर्घटना घडली नाही.
पार्किंगच्या ठिकाणी एका मागोमाग एक दुचाकीनी पेट घेतल्याने पंधरा दुचाकीचें मोठे नुकसान झाले. माटुंगा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून आग नेमकी कशी लागली याचा तपास सुरू केला आहे.
