मुंबईत मोठी दुर्घटना! धावत्या लोकल ट्रेनमधून २ तरुण पडले, एकाचा जागीच मृत्यू तर दुसऱ्याची प्रकृती चिंताजनक

मुंबई : मुंबईच्या लोकलमधून प्रवास करणं दिवसेंदिवस कठीण होत चालल आहे.वाढती प्रवाशांची संख्या,अपुऱ्या रेल्वे गाड्यांची संख्या, निष्काळजीपणा आणि प्रशासनाच दुर्लक्ष यामुळे प्रत्येक प्रवाशांना जीव धोक्यात टाकून प्रवास करावा लागत आहे.अशातच आता ट्रेनमध्ये लटकून प्रवास करणं दोन तरुणांच्या जीवावर बेतलं आहे. वसई-नायगावदरम्यान धावत्या लोकलमधून पडून एका तरुणाचा मृत्यू, तर एक गंभीर जखमी झाला आहे. दरवाज्यातून लटकून प्रवास करताना तोल गेल्याने भीषण अपघात घडला. पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.

समोर आलेल्या माहितीनुसार, वसई नायगाव रेल्वे स्थानकाच्या मधोमध हा अपघात झाला आहे. दरवाज्यातून लटकून प्रवास करताना तोल गेल्याने या तरुणाचा भीषण अपघात घडला आहे.
विरार रेल्वे स्थानकातून सकाळी ९ वाजून १० मिनिटांनी चर्चगेटकडे एक लोकल रवाना झाली.या लोकलमधून प्रतीश बाळाराम भोले आणि नानासाहेब मदने हे दोघे प्रवास करत होते. लोकलच्या दरवाज्यात उभे राहून हे दोघेही प्रवास करत असल्याने तोल जाऊन धावत्या गाडीतून दोघेही खाली कोसळले. या दुर्घटनेत प्रतीश बाळाराम भोले याचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर नानासाहेब मदने या तरुण गंभीर जखमी झाला आहे.मदने यांची प्रकृतीही चिंताजनक आहे.
दरम्यान जखमी तरुणाला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तर मृत तरुणाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आल आहे. या अपघातानंतर पश्चिम रेल्वेवरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत असून या घटनेने मृत तरुणाच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
