सावधान! राज्यात मुसळधार पाऊस कोसळणार, ‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी, जाणून घ्या हवामान विभागाचा अंदाज..

पुणे : वेळेआधीच हजर झालेला मान्सूनने आता दडी मारली आहे. राज्यात आता मान्सून थेट १३ जून रोजी सक्रीय होणार आहे. मे महिन्यातच दाखल झालेल्या मान्सूनने सुरुवातीच्या काही दिवसांतच नागरिकांची दाणादाण उडवली होती.

अशातच आता हवामान विभागाने पुढील २४ तासांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. विशेषतः कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, ९ जून रोजी कोकण, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. यामुळे नागरिकांनी सुरक्षिततेच्या उपाययोजना करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगडमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. मात्र या जिल्ह्यांसाठी कोणताही अलर्ट दिलेला नाही. दुसरीकडे, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज असून या ठिकाणी यलो अलर्ट जारी (Weather yellow alert) करण्यात आला आहे.
दरम्यान, पुणे, सातारा, सांगली आणि सोलापूरसह घाटमाथ्याच्या भागांमध्येही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. यामुळे नागरीकांनी अत्यंत सतर्क राहण्याचे आवाहन हवामान विभागाने केले आहे.
मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, बीड, नांदेड, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. या भागांत वादळी वारे आणि विजांसह जोरदार पावसाचा अंदाज आहे.
तर परभणी, हिंगोली, जालना आणि छत्रपती संभाजीनगरसारख्या जिल्ह्यांत हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. मात्र या ठिकाणी सध्या कोणताही अलर्ट दिलेला नाही.