सावधान! महाराष्ट्राच्या अनेक शहरात उष्णतेच्या लाटेचा धोका, काय काळजी घ्यावी? जाणून घ्या…


मुंबई : यंदा फेब्रुवारी महिन्यातच प्रचंड उष्णता जाणवली. आता पुढील दोन महीने उष्णता आणखी वाढण्याच्या अंदाज आहे. राज्यात उन्हाचा तडाखा वाढत असून . रविवारी (ता.९) सकाळपर्यंतच्या २४ तासांत सोलापूरमध्ये ३९.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

हवामान विभागाने आज (ता. १०) मुंबईसह कोकणातील पालघर, ठाणे, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांसाठी उष्ण लाटेचा इशारा (येलो अलर्ट) दिला आहे. सिंधुदुर्गात तापमान सरासरीपेक्षा अधिक उष्ण व दमट राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

महाराष्ट्रातील उर्वरित भागातही उन्हाची तीव्रता कायम राहणार असून, तापमान वाढण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. रविवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत देशातील सर्वाधिक तापमान आंध्र प्रदेशातील कर्नूल येथे ३९.४ अंश सेल्सिअस नोंदवले गेले.

महाराष्ट्रात सोलापूर पाठोपाठ अकोला येथे ३९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. याशिवाय जेऊर, सांगली, सातारा, पुणे, ब्रह्मपुरी, चंद्रपूर आणि नागपूर येथेही कमाल तापमान ३८ अंशांच्या वर पोहोचले.

धुळे, जळगाव, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, अमरावती, भंडारा, गडचिरोली, वर्धा आणि वाशीम या ठिकाणीही तापमान ३७ अंशांच्या पुढे गेले. कमाल तापमानाच्या वाढीमुळे उन्हाच्या झळा तीव्र झाल्या असून, नागरिकांना उष्णतेचा त्रास जाणवत आहे.

किमान तापमानातही वाढ होत असून, निफाड येथील गहू संशोधन केंद्रात रविवारी १२.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. राज्याच्या विविध भागांमध्ये कमाल आणि किमान तापमानात १४ ते २४ अंशांपर्यंत तफावत होती, यामुळे रात्री व पहाटे गारवा जाणवत असला तरी दिवसा उष्णता असह्य होत आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील काही दिवस उन्हाची तीव्रता कायम राहण्याची शक्यता असून, विशेषतः कोकण विभागात उष्ण लाटेचा प्रभाव राहील.

उष्णतेच्या या तीव्र लाटेमुळे नागरिकांनी विशेष काळजी घेण्याची गरज आहे. दुपारच्या वेळी शक्यतो घराबाहेर जाणे टाळावे, भरपूर पाणी प्यावे आणि निर्जलीकरण टाळण्यासाठी द्रव पदार्थांचे सेवन करावे.

उन्हाच्या तीव्रतेपासून बचाव करण्यासाठी हलका आणि सैलसर कपडे घालावेत तसेच लहान मुले, वृद्ध आणि आरोग्यदृष्ट्या संवेदनशील व्यक्तींनी अधिक खबरदारी घ्यावी. पुढील काही दिवस उन्हाचा तडाखा कायम राहण्याचा हवामान खात्याचा अंदाज असून, नागरिकांनी आवश्यक ती सावधगिरी बाळगावी.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!