सावधान! उरुळी कांचन येथे चार ठिकाणी घरफोडी, रोख रकमेसह ४ लाखांचे दागिने चोरीला…
उरुळी कांचन : पुणे – सोलापूर महामार्गावरील उरुळी कांचन (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीत चार सदनिकांचे कुलूप तोडून चोरट्यांनी रोख रक्कमेसह सुमारे ४ लाख १८ हजार रुपयांच्या सोन्याच्या दागिन्यांची चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे. हि घटना सोमवारी (ता. २६) सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली आहे.
याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात डॉ. किरण सुहास शिंदे (वय- ३७, धंदा – डॉक्टर, रा. स्वर गंधा सोसायटी, उरुळी कांचन, ता. हवेली) यांनी अज्ञात चोरट्यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
मिळालेल्या माहिती नुसार, पुणे – सोलापूर महामार्गाच्या शेजारी असलेल्या स्वर गंधा या सोसायटीत डॉ. किरण शिंदे हे कुटुंबासहित राहतासून पेशाने त्या डॉक्टर आहेत. सोमवारी सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास शिंदे या काही कामानिमित्त बाहेर गेल्या होत्या.
त्यानंतर सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास घरी आल्या त्या वेळेस घराचा कडी कोयंडा तुटलेल्या अवस्थेत दिसून आला. घरात जाऊन पाहणी केली असता घरातील साहित्य हे अस्ताव्यस्त पडलेल्या अवस्थेत दिसून आले यावरून घरात चोरी झाल्याचे समजले.
यावेळी कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा ४ लाख १८ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरी झाल्याचे दिसून आले. लोणी काळभोर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांच्या विरोधात फिर्याद दिली.तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
स्वर गंधा या सोसायटील तीन सदनिका चोरट्यांनी फोडल्या असून कोहिनूर सोसायटी या ठिकाणीही एका सदनिकेत चोरी झाल्याचे निष्पन्न झाले आहे. तसेच सदर ठिकाणी लोणी काळभोर पोलिसांनी भेट दिली. घटनेचा पंचनामा केला असून अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.