शासनाचा मोठा दणका! ‘या’ ३ प्रकारातील रेशन कार्डचे लाभ होणार बंद, तुमचाही समावेश आहे का? जाणून घ्या संपूर्ण माहिती..

पुणे : सार्वजनिक वितरण व्यवस्थेत पारदर्शकता आणण्यासाठी आणि अपात्र लाभार्थ्यांना वगळण्यासाठी राज्याच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाने ‘मिशन सुधार’ हे व्यापक अभियान हाती घेतले आहे.

या अभियानाअंतर्गत मृत, दुबार तसेच संशयास्पद शिधापत्रिकाधारकांची नावे लाभार्थी यादीतून वगळण्याची प्रक्रिया वेगाने सुरू आहे. शासनाकडून आधार क्रमांक, कुटुंबीयांची माहिती आणि प्रत्यक्ष तपासणीच्या आधारे शिधापत्रिकांचे शुद्धीकरण केले जात आहे.
मिशन सुधार अभियानांतर्गत तालुका स्तरावर पुरवठा निरीक्षक आणि कर्मचारी घरोघरी भेट देत शिधापत्रिकांची तपासणी करत आहेत. आधार क्रमांकाची पडताळणी, कुटुंबातील सदस्यांची संख्या, वास्तव्यास असलेली व्यक्ती आणि कागदपत्रांची माहिती तपासली जात आहे.

दरम्यान, या सर्व माहितीच्या आधारे तालुकानिहाय संशयास्पद लाभार्थ्यांची प्राथमिक यादी तयार करण्यात आली आहे. शहरी तसेच ग्रामीण भागात ही तपासणी मोहीम सुरू असून, मोठ्या प्रमाणावर त्रुटी समोर येत असल्याचे चित्र आहे.
तपासणी पूर्ण झाल्यानंतर संशयास्पद, मृत किंवा दुबार नावे वगळण्याचा अंतिम अधिकार तहसीलदारांकडे असणार आहे. जिल्हा पुरवठा विभागाकडून अंतिम यादी तयार केल्यानंतर तहसीलदार स्तरावर छाननी करून योग्य ती कार्यवाही केली जाणार आहे. या प्रक्रियेमुळे केवळ पात्र लाभार्थ्यांनाच शिधापत्रिकेचा लाभ मिळेल, असा विश्वास प्रशासनाकडून व्यक्त केला जात आहे.
दरम्यान, राज्य शासनामार्फत रास्त भाव दुकानदारांद्वारे शिधापत्रिकाधारकांना मोफत धान्य पुरवठा केला जात आहे. मात्र, या योजनेत काही ठिकाणी अपात्र लाभार्थी, दुबार नोंदी किंवा मृत व्यक्तींच्या नावावर धान्य उचल होत असल्याचे आढळून आले होते. हे गैरप्रकार थांबवण्यासाठी यापूर्वीही सर्वेक्षण करून अनेक लाभार्थ्यांची नावे वगळण्यात आली होती. आता मिशन सुधार अभियानाद्वारे पुन्हा एकदा काटेकोरपणे छाननी केली जात आहे.
