बंद दाराआड शरद पवार, सुप्रिया सुळे आणि कटारिया यांच्यात बराच वेळ चर्चा? निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या भेटीमुळे भाजपच्या गोटात खळबळ!
दौंड : बंद दाराआड शरद पवार, सुप्रिया सुळे आणि कटारिया यांची बराच वेळ चर्चा झाली आहे. बंद दाराआड या तिघांमध्ये नेमकी काय चर्चा झाली हे मात्र गुलदस्त्यातच राहिले आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या भेटीमुळे भाजपच्या गोटात मात्र खळबळ उडाली आहे.
प्रेमसुख कटारिया यांच्याकडे मागील अनेक वर्षांपासून दौंड नगरपालिकेची सत्ता आहे. तर दौंड शहरात त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे. ते ज्यांच्याकडे जातील, त्यांच्या पक्षाचे मताचे पारडं जड असते. त्यामुळे शरद पवार यांनी कटारिया यांच्या घेतलेल्या भेटीमुळे दौंडच्या राजकारणाला वेगळीच कलाटणी मिळते का? याची चर्चा लगेच सुरू झाली.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बारामती मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारार्थ माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार हे मैदानात उतरले आहेत. बारामती मतदारसंघाचा कानाकोपरा ते सध्या पिंजून काढत आहेत. प्रत्येक राजकीय हालचालींवर त्यांची बारीक नजर आहे.
इंदापूर तालुक्यातील माजी जिल्हा परिषद सदस्य प्रवीण माने यांनी शरद पवार यांची साथ सोडून नुकतीच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये उडी मारली आहे. ते आता सुनेत्रा पवार यांचा प्रचार करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. हा शरद पवार यांना मोठा राजकीय धक्का मानला जात आहे. इंदापूर तालुक्यात अजित पवार गटांना शरद पवार यांना धक्कातंत्र दिला असताना आता शरद पवार यांनी दौंडमध्ये भाजपला धक्का देण्याचे ठरवले आहे.
माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार व सुप्रिया सुळे यांनी रविवारी (दि ७) दौंड शहरातील आयोजित एका समाजाचा संवाद मेळाव्याला उपस्थिती दर्शवली. यावेळी त्यांनी भाजप आमदार राहुल कुल यांचे खंदे समर्थक दौंड शहराचे माजी नगराध्यक्ष आणि नागरिक हित संरक्षण मंडळाचे अध्यक्ष प्रेमसुख कटारिया यांची ते अध्यक्ष असलेल्या शाळेत जाऊन भेट घेतली. त्यांच्यासोबत खासदार सुळेही होत्या.