:बीड सरपंच हत्या प्रकरण ; ‘वाल्मिक कराडला फासावर लटकवेपर्यंत शांत बसणार नाही’, राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याचा पण

बीड : बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची गेल्या वर्षी 29 नोव्हेंबर रोजी अपहर करून अत्यंत निर्घृण हत्या करण्यात आली होती. या घटनेला आज एक वर्ष पूर्ण झाले. याप्रकरणातील कृष्णा आंधळे वगळता इतर आरोपींना अटक करण्यात आली आहे. दरम्यान राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याने एक मोठा पण केला आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मीक कराडला जोपर्यंत फाशी होत नाही तोपर्यंत शांत बसणार नाही असे मोठे विधान आमदार संदीप क्षीरसागर यांनी मस्साजोग येथे केले आहे.
आज मस्साजोग येथे सरपंच संतोष देशमुख यांचे पहिले पुण्यस्मरण आहे. त्यानिमित्ताने मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील, शरद पवार राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर, खासदार बजरंग सोनवणे, उद्धव सेनेचे नेते अंबादास दानवे यांच्यासह अनेक मोठे नेते उपस्थित आहेत.यावेळी आमदार संदीप क्षीरसागर यांनी ‘वाल्मिक कराडला फासावर लटकवेपर्यंत शांत बसणार नाही’, असा पण केला आहे. वाल्मिक कराडचा सीडीआर रिपोर्ट काढावा अशी मागणी आपण सुरुवातीपासून करत आहोत. सीडीआर काढल्यास कराड याला कोणी कोणी मदत केली याची माहिती समोर येईल असे संदीप क्षीरसागर म्हणाले. सगळ्यांना वाईट वाटतं, सगळ्या देशमुख कुटुंबाच्या डोळ्यात अश्रू आहेत असे ते म्हणाले.दरम्यान येत्या 12 तारखेला या प्रकरणी दोषारोप पत्र दाखल होणार असल्याचे क्षीरसागर म्हणाले. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडाला आज एक वर्ष पूर्ण झाल्याने संदीप क्षीरसागर यांनी देशमुख कुटुंबियांची भेट घेतली.
दरम्यान याप्रकरणी वाल्मिक कराड पुण्यात शरण येताच इतर आरोपींना सुद्धा पुण्यातूनच अटक करण्यात आली होती. पण कृष्णा आंधळे अद्यापही पोलिसांच्या हाती लागलेला नाही. तो कधी नाशिकमध्ये दिसला तर कधी पुण्यात दिसला अशा अफवा उठत राहिल्या. पण त्याला अद्यापही पोलीस अटक करू शकलेले नाही. त्याने पोलीस यंत्रणेला खुले आव्हानच दिले आहे. दरम्यान फरार आरोपी कृष्णा आंधळे हा जिवंत आहे की नाही याबाबत आमदार क्षीरसागर यांनी शंका व्यक्त केली आहे.

