Beed News : पावसाने दगा दिला, पीक जळाली, आता बापाने काढलेले कर्ज फेडायचे कसे.? विषारी इंजेक्शन घेऊन शेतकरी पुत्राची आत्महत्या…
Beed News बीड : राज्याकडे गेल्या महिनाभरापासून पावसाने पाठ फिरवली आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये पाऊस नसल्याने खरीप हंगामातील पिके करपून चालली आहे. दुबार पेरणी करून सुद्धा पावसाने दिलासा दिला नसल्याने बळीराजा आर्थिक संकटात सापडला आहे.
शेतातील उभी पिके करपली, मग आपल्या शेतकरी (Farmer) बापाने घेतलेले कर्ज कसं फेडायचं ? त्यात आपल्यावर बेरोजगारीचे संकट, या विवंचनेतून एका २५ वर्षीय शेतकरी (Farmer) पुत्राने स्वतःला विषारी इंजेक्शन टोचून आपली जीवनयात्रा संपवली आहे. बीड जिल्ह्यातील (Beed News) धारूर तालुक्यातील भोपा गावात गुरुवारी (ता. ७ ) दुपारसच्या सुमारास ही घटना घडली आहे.
किरण पांडुरंग वाघचौरे (वय. २५ वर्ष) असे आत्महत्या केलेल्या शेतकरी पुत्राचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, किरणचे वडील पांडुरंग वाघचौरे यांच्यावर तेलगाव येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे कर्ज होते. गेल्यावर्षी अवकाळीमुळे पावसामुळे शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले होते.
हातातोंडाशी आलेला घास हिरावून गेल्याने पांडुरंग वाघचौरे यांना कर्ज फेडणे कठीण झाले. त्यात यावर्षी पावसाने बीड जिल्ह्याकडे पाठ फिरवली. दुबार पेरणी करून सुद्धा पावसाने पाठ फिरवल्याने वाघचौरे कुटुंबिय आर्थिक संकटात सापडले.
अशातच वडिलांवर झालेला कर्जाचा डोंगर कसा फेडायचा, आपण बेरोजगार आहोत, याची चिंता किरणला लागली होती. याच चिंतेतून किरणने स्वत:ला विषारी इंजेक्शन टोचून घेतले. त्याच्या अचानक जाण्याने संपूर्ण कुटुंबाला धक्का बसला आहे.