धक्कादायक बातमी! बीसीसीआयच्या ब्रॉडकास्ट इंजिनिअरचा हॉटेलमध्ये संशयास्पद मृत्यू; क्रिकेट विश्वात खळबळ..

मुंबई : मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील सामन्यानंतर एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आयपीएल सामन्यानंतर दुसऱ्याच दिवशी BCCIशी संबंधित ब्रॉडकास्ट इंजिनियर विल्यम लेग्नफोर्ड यांचा संशयास्पद मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

त्यांचा मृतदेह ट्रेडेन्ट हॉटेल येथे आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असून, मृत्यूमागील नेमकं कारण काय आहे, याचा शोध घेतला जात आहे.
माहितीनुसार, 30 मार्च रोजी सकाळी हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी रूममध्ये प्रतिसाद मिळत नसल्याने तपास केला असता हा प्रकार उघडकीस आला. विल्यम लेग्नफोर्ड हे 24 मार्चपासून हॉटेलमधील 2715 क्रमांकाच्या खोलीत राहत होते.

सकाळी रिसेप्शनमधून फोन करूनही प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर कर्मचाऱ्यांनी मास्टर कीने खोली उघडली असता ते आत मृत अवस्थेत आढळून आले. तातडीने बोलावलेल्या डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
तसेच या घटनेची नोंद मुंबई पोलीस यांच्या मराईन ड्राईव्ह पोलीस स्टेशन येथे करण्यात आली आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोस्टमॉर्टम रिपोर्ट आणि वैद्यकीय तपासणीनंतरच अधिक माहिती समोर येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
विल्यम लेग्नफोर्ड हे मूळचे ब्रिटनचे नागरिक होते आणि ते आयपीएल सामन्यांच्या प्रसारणासाठी भारतात आले होते. IPL 2026 च्या सामन्यांच्या ब्रॉडकास्ट व्यवस्थापनाशी ते संबंधित होते. त्यांच्या अचानक झालेल्या मृत्यूमुळे आयपीएल वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.