बावनकुळे साहेब, आपल्या पक्षाचा आणि मेघा इंजिनिअरिंगचा पर्दाफाश करणारच! विधानसभेत भेटूया, आमदार रोहित पवार कडाडले…


मुंबई : सध्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यात जोरदार आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. सध्या रोहित पवार यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. यात रोहित पवार म्हणाले, आदरणीय बावनकुळे साहेब, मी आपलीच कागदपत्रे आपणास पुरावे म्हणून दिली आणि अत्यंत साधे सरळ सोपे प्रश्न विचारले.

आपण उत्तरे देण्याचा प्रयत्न केला पण प्रत्येक उत्तरानंतर आपण अजून खोलात रुतत गेलात त्यामध्ये माझी काय चूक? मी दिलेले पुरावे आणि आपली उत्तरे बघता कापूसकोंड्याची गोष्ट कोण सांगतंय हे महाराष्ट्राला वेगळे सांगण्याची गरज नाही.

एकीकडे एखाद्या गावकऱ्याने घर बांधकामासाठी थोडी वाळू किंवा मुरूम घेतला तर ट्रॅक्टर जमा होतो, रस्त्यावर भाजीपाला विकला किंवा फेरीवाला काही विकत असेल तर साहित्य जप्त केले जाते, चुकून नो पार्किंगमध्ये गाडी लागली तर ७८६ चा दंड आणि मागचे एक चलन भरल्याशिवाय गाडी भेटत नाही, साधी पाणीपट्टी किंवा वीजबिल थकले तरी कनेक्शन कट केले जाते.

परंतु दुसरीकडे मेघा इंजिनिअरिंग सारख्या कंपनीला कोट्यवधींच्या दंडात ९९ % डिस्काउंट ची बंपर ऑफर दिली जाते. नियम तोडले तर दंड केलाच पाहिजे, परंतु सर्वसामान्यांना दंड आणि बॉण्डवाल्यांना माफी हे योग्य आहे का ? स्थगितीच्या नावाने डिस्काउंट देत वसुली थांबवायची याला स्थगिती नाही तर ‘छुपी दंड माफीच’ म्हणावी लागेल.

मेघा इंजिनिअरिंगला दिलेली डिस्काउंट ऑफर बघता मेघा इंजिनिअरिंग आणि आपल्या पक्षाचा काय बॉण्ड आहे हे देखील यानिमित्ताने महाराष्ट्राला पून्हा एकदा कळून चुकले आहे. विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात चर्चा तर आम्ही घडवून आपल्या पक्षाचा आणि मेघा इंजिनिअरिंगचा बॉण्ड प्रकरणाचा पर्दाफाश आम्ही करणारच आहोत. विधानसभेत नक्कीच भेटूया.

परंतु, तूर्तास आपण या प्रकरणावर मेघा इंजिनिअरिंगच्या 95 कोटीच्या दंडाबाबत महसूलमंत्री म्हणून काय कारवाई करणार आहात, आधीच्या महसूलमंत्र्यांनी दिलेली स्थगिती उठवून दंड वसूल करणार आहात का ? मेघा इंजिनिअरिंगच्या सातारा जिल्ह्यातील 105 कोटीच्या दंडमाफीचे दुसरे प्रकरण आपणास दिले आहे, त्यावर आपण काय कारवाई करणार आहात?

विधानसभेच्या अधिवेशनाची वाट न बघता आपण त्वरित कारवाई करणार का? या प्रश्नांच्या उत्तरांची मी एकटा नाही तर संपूर्ण महाराष्ट्र वाट पाहत आहे. आपणास शुभेच्छा! अशी पोस्ट रोहित पवार यांनी केली आहे. यामुळे वातावरण चांगलेच तापले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!