Baramati News : मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री २ मार्चला बारामती दौऱ्यावर, बस स्थानक, पोलीस उपमुख्यालयाचे होणार उद्घाटन..
Baramati News : राज्याचा राजकारणात सध्या अनेक घडामोडी घडताना दिसत आहे. लवकरच राज्यात निवडणुका पार पडणार आहेत. अशातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार हे २ मार्च रोजी बारामतीत येत आहेत.
त्यांच्या हस्ते येथे विविध विकासकामांची उद्घाटने होणार असून, नमो महारोजगार मेळाव्याचेही आयोजन करण्यात आले आहे. आचारसंहितेपूर्वी बारामतीतील विकासकामांची उद्घाटने व्हावीत, असा अजित पवार यांचा आग्रह होता. यानिमित्त महायुती लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचे रणसिंग बारामतीतून फुंकेल, अशी चिन्हे आहेत. Baramati News
बारामती शहरातील अत्याधुनिक बसस्थानक, बऱ्हाणपूर येथील पोलिस उपमुख्यालय व उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयानजीक उभारण्यात आलेल्या पोलिस वसाहतींचे उद्घाटन २ मार्च रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्या हस्ते होईल. त्यासाठी आता बारामतीतील प्रशासकीय यंत्रणा कमालीची गतिमान झाली आहे.
दरम्यान, शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी प्रशस्त बसस्थानकाची उभारणी करण्यात आली आहे. ५० कोटी रुपये खर्चून हे बसस्थानक उभारण्यात आले आहे. विमानतळाच्या धर्तीवर बसस्थानकाचा आराखडा बनविला असून, एकाच वेळेस फलाटावर २२ बसेस, तर रात्री मुक्कामी ८० बसेस उभ्या राहू शकतील अशी व्यवस्था करण्यात आली आहे. जिल्हा ग्रामीण पोलिस दलाचा ताण कमी व्हावा, या उद्देशाने बऱ्हाणपूरला पोलिस उपमुख्यालय उभारण्यात आले आहे.