Baramati : बारामतीत हॉटेल व्यावसायिकाचे अपहरण, नंतर ४० टक्के व्याजाने वसुली, धक्कादायक माहिती आली समोर, तिघांवर गुन्हा दाखल….
Baramati : खासगी तीन सावकारांनी हॉटेल व्यवसायिकाचे अपहरण करीत त्याच्याकडून महिना ४० टक्के व्याजाने वसुली केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना २२ मार्च ते २० मे २०२४ या काळात साडे दहा वाजण्याच्या सुमारास हरीकृपानगर बारामती (ता. बारामती) येथे घडली आहे, ही माहिती बारामती शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांनी दिली.
याप्रकरणी व्यवसायिकाच्या पत्नीने दिलेल्या तक्रारीनुसार तिघांवर विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सागर गवळी (रा. माळावरची देवी, बारामती), विकास माने (रा. माळेगाव ता. बारामती) विक्रम थोरात (रा. एम.आय.डी.सी. जळोची रोड, बारामती) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तीन खासगी सावकारांची नावे आहेत. याप्रकरणी हॉटेल व्यवसायिकाची पत्नी स्वाती सुरेश ननवरे यांनी १९ ऑगस्टला बारामती शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
सविस्तर माहिती अशी की, हॉटेल व्यावसायिक सुरेश ननवरे यांनी २२ मार्च ते २० मे २२४ या दरम्यान खाजगी सावकार सागर गवळी, विकास माने, विक्रम थोरात यांच्या कडून ५० हजार रूपये व्याजाने घेतले होते. त्याच्या मोबदल्यात ननवरे यांनी ३० हजार रूपये व्याज देवूनही व्याजापोटी 2 लाख 25 हजार रूपये द्यावे लागतील म्हणुन व्याजा पोटी मारूती सुझुकी कंपनीची सेलेरिओ कार जबरदस्ती घेवून गेले होते. Baramati
सुरेश ननवरे व्याज देत नाहीत म्हणून तिन्ही आरोपींनी मंगळवारी (ता. २०) दिवसभर त्याचे अपहरण करून जबरदस्तीने त्यांना तादुळवाडी म्हसोबा मंदीर जवळ ओढ्यात घेऊन जात त्यांना गुप्त पणे बांधून ठेवल्याप्रकरणी तिघांवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस निरीक्षक संतोष घोळवे करीत आहेत.
दरम्यान, याबाबत बोलताना पोलीस निरीक्षक संतोष घोळवे म्हणाले, ”बेकायदेशीर सावकारी विषयी तक्रारदार यांनी पुढे यावे. तक्रार आल्यास ती कारवाई अधिक ताकदीने करता येईल, हेही वास्तव आहे. त्यानुसार तक्रार आल्यास पोलिस थेट कारवाई करतानाही दिसत आहेत. या महिन्यातील बारामती शहर पोलीस ठाण्यात दुसरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.