Baramati : खुनाचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणातून पुराव्याअभावी चौघांची सुटका, बारामती सत्र न्यायालयाचा निकाल…

Baramati : शेतीच्या कारणावरुन का भांडता? अशी विचारणा करणाऱ्या मायलेकींवर कोयत्याने वार करुन व काठीने मारहाण करीत जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली होती. आता याप्रकणी चार आरोपींची पुराव्याअभावी बारामती सत्र न्यायासयाच्या न्यायाधीश जे. पी. दरेकर यांनी निर्दोष मुक्तता केली.

तानाजी महानवर व इतर तीन ( सर्व रा. शिवपुरी, पणदरे, ता. बारामती) अशी निर्दोष मुक्तता केलेल्या आरोपींची नावे आहेत.

नेमकं प्रकरण काय?
पणदरे येथे २८ जुन २०१४ रोजी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली होती. फिर्यादी व तिची मुलगी यांनी आरोपींच्या घरी जाऊन शिवीगाळ का केली, तसेच शेतीच्या कारणावरून का भांडता, अशी विचारणा केली होती.

त्यावेळी आरोपींनी कोयताने फिर्यादीच्या डोक्यावर वार केले व इतर आरोपींनी काठीने मारहाण केली. यावरून अरुणा बरकडे ( वय- ४१, रा पणदरे, ता. बारामती) यांनी वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार पोलिसांनी आरोपीं विरुद्ध भादंवि ३०७, ३२४, ५०४, ५०६ कलमान्वये वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. Baramati
या खटल्यात सरकारी पक्षातर्फे एकूण सहा साक्षीदार तपासण्यात आले. त्यात दोन प्रत्यक्षदर्शी जखमी साक्षीदार तसेच तपास करणारे तत्कालीन पोलीस निरीक्षक भोसले यांची साक्ष नोंदविली होती. आरोपींतर्फे अॅड. विशाल बर्गे यांनी कामकाज पाहिले.
फिर्यादी आणि आरोपींमध्ये जमिनीवरून वाद असल्याबाबत पुरेसा पुरावा नाही. तसेच जखमींना तातडीने उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यावेळी दवाखान्यात दिलेल्या माहितीत केवळ दोन आरोपींचा हल्लेखोर म्हणून उल्लेख केला होता. बाकी दोन आरोपींना नंतर का सामील करून घेतले, हा मुद्दा आरोपींतर्फे अॅड. बर्गे यांनी न्यायालयासमोर उपस्थित केला.
तपासावेळी फिर्यादीचा मेहुणा मोहन घुले यांनी साक्षीदार व पंच यांची नावे पोलिसांना दिल्याचे न्यायालयासमोर झालेल्या उलट तपासणीत मान्य केले होते. शिवाय दोन्ही जखमी साक्षीदारांच्या न्यायालयातील साक्षीत मोठी तफावत, तसेच गुन्ह्यातील हत्यारांबाबत विश्वसनीय पुरावा नाही.
दरम्यान, घटनेबाबत फिर्यादी व साक्षीदार यांच्यात एकवाक्यता नाही. या बाबीचा विचार करता तथाकथित घटना सरकारी पक्षाने निर्विवाद सिद्ध केली नाही हा बचाव पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने चारही आरोपींची सबळ पुराव्याअभावी मुक्तता केली.
