बारामती सजली! उपमुख्यमंत्री झाल्याने अजित पवारांच्या वाढदिवसाला जंगी स्वरूप..
बारामती : अजित पवार हे गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात केंद्रबिंदू ठरले आहेत. राष्ट्रवादीत काँग्रेसमध्ये बंडखोरी करत अजितदादांसह आमदारांचा मोठा गट थेट शिंदे फडणवीस सरकारमध्ये दाखल झाला आहे. अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची तर आठ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली.
उपमुख्यमंत्री बनलेले अजित पवार यांचा उद्या वाढदिवस आहे. या वाढदिवसाच्या निमित्ताने पहिल्यांदाच बारामती मध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, रक्तदानावर यावर्षी सर्वांचा भर आहे.तसेच राष्ट्रीय व राज्य सायकल स्पर्धा नेहमीप्रमाणे होणार आहे.
वाढदिवसाच्या निमित्ताने बारामती सजली आहे. तसेच विविध उपक्रमांची रेलचेल देखील दिवसभरात आहे. यामध्ये बारामतीतील राजमुद्रा ग्रुप तसेच सोमनाथ गायकवाड यांच्या वतीने मोठ्या प्रमाणावर रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, राष्ट्रवादी शहर काँग्रेसच्या वतीनेही पहिल्यांदाच भव्य दिव्य असे रक्तदान शिबिर होणार आहे.
राष्ट्रीय व राज्यस्तराबरोबरच बारामती ते माळेगाव महिला पुरुष व १७ ते १८ वयोगटातील मुला मुलींसाठी देखील स्पर्धा होत आहे. राष्ट्रीय स्तरावरील या स्पर्धेसाठी ४०० ते ५०० स्पर्धकांचा सहभाग राहणार असून त्या निमित्ताने आजपासूनच बारामतीत तयारीला सुरुवात झाली आहे.
या व्यतिरिक्त नटराज नाट्य मंडळाच्या वतीने देखील रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले. पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या वतीने आठवी राष्ट्रीय व राज्य स्तर सायकल स्पर्धा – २०२३ चे आयोजन करण्यात आले आहे.
शनिवारी २२ जुलै रोजी सकाळी हडपसर येथील लाइटिंग सेंटर पासून पुणे ते बारामती या स्पर्धेला सुरुवात होणारा असून बारामतीतील गदिमा सभागृहात या स्पर्धेच्या विजेत्यांचा पारितोषिक वितरण समारंभ होणार आहे.