बारामतीची पोटनिवडणूक गाजणार! काँग्रेसच्या भूमिकेवर जय पवारांनी शड्डू ठोकला, विरोधकांनी खुशाल.. …

बारामती : अजित पवार यांच्या निधनाने रिक्त झालेल्या बारामती विधानसभा पोटनिवडणुकीचा अर्ज राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या सोमवारी भरणार आहेत. ही निवडणूक बिनविरोध होण्याच्या आशा मावळल्या असून काँग्रेस पक्षाने बारामतीत उमेदवार देण्याचा निर्णय घेतल्याने सुनेत्रा पवार यांच्यापुढे आव्हान निर्माण झाले आहे. यावर आता सुपुत्र जय पवार यांनी ही शड्डू ठोकला आहे.

बारामती पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसने घेतलेल्या भूमिकेवर जय पवार म्हणाले,विरोधकांपैकी कुणाला लढायचे असेल तर त्यांनी खुशाल लढावे. बारामतीकर कुणाच्या सोबत आहे, हे सगळ्यांना माहिती आहे, असे ते म्हणाले.अजित पवार यांच्याशिवायची निवडणूक याची कधीही कल्पना केली नव्हती. मात्र दादा आता आपल्यात नाहीत. त्यांच्या नंतर ही पहिलीच निवडणूक आहे. बारामतीकर कुणाच्या सोबत आहे, हे सगळ्यांनाच माहिती आहे.बारामतीकरांचा काय निर्णय आहे, हे सर्वांना ज्ञात आहे, असे जय पवार म्हणाले.
बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध होईल अशी शक्यता सुरुवातीला वर्तवण्यात येत होती.मात्र. याच पार्श्वभूमीवर निवडणुकीच्या तयारीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून जय पवार यांनी चौकसभा घेण्यास सुरुवात केली आहे. विरोधकांच्या भूमिकेसंदर्भात विचारले असता निवडणुकीसाठी आम्ही तयार असल्याचे त्यांनी ठणकावून सांगितले.

बारामतीची निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी महायुतीचा प्रयत्न आहे. खुद्द उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी महाविकास आघाडीतील प्रमुख पक्ष असलेल्या शिवसेना पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना फोन करून पाठिंब्याची विनंती केली. दुसरीकडे काँग्रेस पक्ष मात्र बारामतीत उमेदवार देण्यावर ठाम आहे. त्यामुळे सुनेत्रा पवार यांच्यापुढे मोठे आव्हान निर्माण झाले आहे.