बारामती बिटकॉइन मार्ट घोटाळा प्रकरण ; आरोपीस सहा महिने तुरुंगवास अन 3 लाखाचा दंड

बारामती: गेल्या काही दिवसापासून बारामतीत दामदुप्पट रक्कम देण्याच आणि शेअरमार्केटमधून मोठी रक्कम मिळून देण्याच आमिष दाखवून अनेकांना लाख रुपयांचा चुना लावल्याची प्रकरण उघडकीस येत आहेत. अशातचबारामतीतील गाजलेल्या बीटमाईन मार्ट घोटाळा प्रकरणाचा निकाल 22 सप्टेंबर 2025 रोजी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी पुजारी यांच्या न्यायालयाने दिला. या निकालात आरोपी सहा महिने तुरुंगवास आणि तब्बल तीन लाखाचा दंड ठोठावण्यात आला आहे. राहुल श्रीकांत हरिहर असं आरोपीचे नाव आहे.

काय आहे प्रकरण?
बारामतीतील ॐकार एंटरप्राईजेस मोबाईल अँड गिफ्ट शाॅपीचे मालक अभिजीत बाबासाहेब थोरात आणि आरोपी राहुल श्रीकांत हरिहर हे जुने मित्र आहेत.आरोपी हा त्या काळात बीटमाईन मार्ट मार्केटिंग कंपनीचा बारामती भागातील मॅनेजर म्हणून कार्यरत होता. सन 2019 दरम्यान आरोपीने विविध कारणास्तव फिर्यादीकडून पावणेतीन लाख रुपये घेतले होते. ही रक्कम वेळेत परतफेड केली जाईल, असे आश्वासन आरोपीने दिले होते. मात्र ठरलेल्या वेळेत पैसे न दिल्याने शेवटी आरोपीने फिर्यादीस परतफेडीसाठी चेक दिला. परंतु तो चेक वटला नसल्याने फिर्यादींनी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला. या निकालात आरोपी हरिहर यास सहा महिन्याचा तुरुंगवास आणि तीन लाखाचा दंड न्यायालयाने ठोठावला.यापैकी 2 लाख 75 हजार रुपये फिर्यादीस नुकसानभरपाई म्हणून देण्याचा आदेशही न्यायालयाने दिला आहे.फिर्यादीतर्फे अॅड. विशाल बर्गे यांनी खटला चालवला आहे.

दरम्यान या प्रकरणात आरोपीकडून बचाव करताना असा दावा करण्यात आला की, कंपनीने आधीच परतफेड केली असून हा खटला मुद्दाम पैसे उकळण्यासाठी दाखल केला आहे. मात्र, फिर्यादीच्या वकिलांनी असा युक्तिवाद केला की, जर परतफेड झाली असती, तर आरोपीने पोलिसांत तक्रार केली असती किंवा बँकेत स्टॉप पेमेंटची नोंद केली असती. तसेच वकिलांच्या नोटिशीला आरोपीने उत्तर दिले नाही आणि चेकवरील सहीही नाकारली नाही. सर्वोच्च न्यायालयाचे आधीचे निकालही दाखल करून फिर्यादीची बाजू बळकट करण्यात आली.न्यायालयाने फिर्यादीचा युक्तिवाद ग्राह्य धरत आरोपी दोषी असल्याचे स्पष्ट केले.