अरे बापरे! बँक कर्मचारी संपावर जाणार, ‘या’ तारखेपासून बँका बंद राहणार; गैरसोय टाळण्यासाठी आधीच उरकून घ्या कामे…

नवी दिल्ली : संपूर्ण देशातील बँक ग्राहकांसाठी ही अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. देशभरातील सर्व सरकारी बँकांचे कर्मचारी एक दिवसाचा संप पुकारणार आहेत. 27 जानेवारी 2026 रोजी देशव्यापी संपाचा इशारा दिला आहे.

युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स यांच्या नेतृत्वाखाली हा संप पुकारण्यात येणार असून पाच दिवसांचा आठवडा लागू करण्याची ही प्रमुख मागणी आहे. जर हा संप झाला, तर बँकांचे कामकाज सलग तीन दिवस ठप्प राहण्याची शक्यता आहे.
तसेच 25 आणि 26 जानेवारी हे आधीच सुट्टीचे दिवस असल्यामुळे 27 जानेवारीचा संप झाल्यास बँकिंग व्यवहारांवर मोठा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे नागरिकांना बँकांशी संबंधित सर्व महत्त्वाची कामे वेळेआधीच पूर्ण करून घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

विशेषतः कॅश व्यवहार, चेक क्लिअरन्स आणि शाखांशी संबंधित सेवा अडचणीत येऊ शकतात. बँक कर्मचारी युनियनच्या म्हणण्यानुसार, मार्च 2024 मध्ये झालेल्या वेतन कराराच्या वेळी पाच दिवसांचा आठवडा लागू करण्यावर सहमती झाली होती.
मात्र, त्यानंतरही सरकार आणि बँक व्यवस्थापनाकडून याबाबत कोणतेही ठोस पाऊल उचलण्यात आलेले नाही. यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी वाढली असून अखेर संपाचा मार्ग स्वीकारण्यात आला आहे.
सध्या बँकांना दुसरा आणि चौथा शनिवार सुट्टीचा असतो. मात्र, उरलेले दोन शनिवारही सुट्टी जाहीर करावी, अशी युनियनची मागणी आहे. त्यासाठी कर्मचारी सोमवार ते शुक्रवार अतिरिक्त वेळ काम करण्यास तयार असल्याचे युनियनने स्पष्ट केले आहे. त्यामुळे एकूण कामकाजाच्या तासांमध्ये कोणतीही घट होणार नसल्याचा दावा युनियनकडून करण्यात येत आहे.
युनियनच्या मते, आरबीआय, एलआयसी, जीआयसी, शेअर बाजार आणि परदेशी चलन बाजार आधीपासूनच पाच दिवस काम करतात. केंद्र आणि राज्य सरकारी कार्यालयेही शनिवारी बंद असतात. अशा परिस्थितीत केवळ बँकिंग क्षेत्राला वेगळे ठेवणे योग्य नसल्याचे युनियनचे म्हणणे आहे. बँकिंग सेक्टर अशा बदलासाठी पूर्णपणे तयार असल्याचा दावा करण्यात आला आहे.