Bangladesh : भयानक! बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, २४ जणांना जिवंत जाळले, अनेकांनी तडफडत सोडला जीव…

Bangladesh : बांगलादेशात आगडोंब उसळला आहे. बांगलादेशातील अवामी लीग पक्षाच्या नेत्याच्या मालकीच्या हॉटेलमध्ये एका इंडोनेशियन नागरिकासह किमान २४ जणांना जमावाने जिवंत जाळले. पक्षाच्या नेत्या शेख हसीना यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा देऊन देश सोडला असताना, ही घटना घडली आहे.

स्थानिक पत्रकार आणि रुग्णालयाच्या सूत्रांनी ही माहिती दिली. सोमवारी रात्री उशिरा जमावाने जोशोर जिल्ह्यातील अवामी लीगचे जिल्हा सरचिटणीस शाहीन चक्कलदर यांच्या मालकीच्या जाबीर इंटरनॅशनल हॉटेलला आग लावली, त्यात २४ जणांचा मृत्यू झाला.


या घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांपैकी बहुतांश हॉटेलमध्ये मुक्कामाला थांबलेले लोक होते. जोशोर रुग्णालयातील डॉक्टरांनी २४ मृतदेह मोजले, तर हॉटेलच्या कर्मचा-यांना ढिगा-याखाली आणखी मृतदेह असल्याची भीती वाटत आहे. Bangladesh
संतप्त जमावाने हॉटेलच्या तळमजल्यावर आग लावली आणि ती लवकरच वरच्या मजल्यांवर पसरली. अशाच घटना संपूर्ण बांगलादेशात घडल्या असून, संतप्त जमावाने एकाच वेळी अनेक अवामी लीग नेते आणि कार्यकर्त्यांच्या घरांची आणि दुकानांची तोडफोड केली आहे.
नाहिद इस्लामयाने म्हटले होते की, लाठी चालली नाही तर आम्ही शस्त्र उचलण्यास तयार आहोत. आता हसीना यांना निर्णय घ्यायचा आहे की त्या पदावरून पायउतार होतील की पदावर राहण्यासाठी रक्तपाताची मदत घेतील. नाहिद हा ढाका विद्यापीठाचा विद्यार्थी आहे. त्याला पोलिसांनी लोखंडी रॉडने मारहाण केली होती.
