राहु परिसरात बैलपोळा उत्साहात साजरा; कुल परिवाराने वारसा जपला..

यवत: दौंड तालुक्यातील यवत परिसरात बैलपोळा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सणाचे औचित्य साधून आपल्या शेतात राबणाऱ्या सर्जा राजाच्या प्रति कृतज्ञतेचा भाव दाखवत व आनंदाने त्यांचे गोड कौतुक करत बैलांना पुरणपोळीचा घास शेतकऱ्यांनी भरविला.

दौंड तालुक्याचे आमदार राहुल कुल यांच्या निवासस्थानापासून राहू परिसरात त्यांचे चिरंजीव आदित्य राहुल कुल यांनी मित्र परिवारासह मोठ्या उत्साहात बैलांची मिरवणूक काढून कुल परिवाराचा वारसा जपला. यात ढोल ताशा लेझीमच्या तालासुरात गावकऱ्यांनी बैलांचे स्वागत केले.
बैल जोडीला माजी आमदार रंजना सुभाष कुल व भाजपा महिला प्रदेश उपाध्यक्ष कांचन कुल यांनी पूजन करून पुरणपोळीचा नैवेद्य दिला. यवत परिसरातील शेतकऱ्यांकडून बैलपोळा सण उत्साहात साजरा करण्यात आला.

येथील बहुतांशी शेतकरी बैलापेक्षा यांत्रिक अवजारे शेती कामासाठी वापरत असल्याने या भागात बैलांची संख्या कमी झाली आहे. परंतु ज्या शेतकऱ्यांकडे बैल आहेत, त्यांनी बैलांची वाजत गाजत मिरवणूक काढून पारंपरिक पद्धतीने बैलपोळा साजरा केला.
यावेळी यवत गावच्या मुख्य बाजारपेठेत बैलांना सजवण्यासाठी लागणाऱ्या रंगासह बेगड, गोंडे, हार, फुगे आदी साहित्यांची दुकाने सजली असताना सदन शेतकऱ्यांनी हे साहित्य खरेदी करण्यासाठी गर्दी केली होती.
यादरम्यान यवत, बोरीऐंदी,बोरीभडक, डाळिंब, कासुर्डी, सहजपूर, भांडगाव, राहू, नांदूर गावातील शेतकऱ्यांनी सजलेल्या बैलांची ग्रामदेवतेच्या मंदिरात पूजा करून बैलांना पुरणपोळी खाऊ घातली. त्यानंतर पारंपरिक पद्धतीने मिरवणूक काढून बैलपोळा सण उत्साहात साजरा केला.