बदलापूर हादरलं; 4 वर्षाच्या चिमुकलीवर चालकाकडून अत्याचार, ‘त्या’ स्कूल व्हॅनबाबत धक्कादायक माहिती समोर

मुंबई : बदलापूर पश्चिम परिसरात एका चार वर्षीय चिमुकलीवर शाळेतून घरी परतत असताना स्कूल व्हॅनमध्येच चालकाने मारहाण करत तिच्यावर अत्याचार केला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली होती.या अत्याचार प्रकरणानंतर प्रशासन खडबडून जागं झालं आहे. ज्या व्हॅनमध्ये ही घटना घडली. त्या व्हॅनबाबत मोठी माहिती समोर आली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, कल्याण प्रादेशिक परिवहन कार्यालयाने संबंधित स्कूल व्हॅनवर कडक कारवाई केली आहे. तपासादरम्यान या स्कूल व्हॅन चालवण्यासाठी कोणतीही वैध परवानगी नसल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. या गंभीर निष्काळजीपणाची दखल घेत आरटीओने संबंधित व्हॅनचा परवाना रद्द करत 24 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.
चार वर्षीय चिमुकली नेहमीप्रमाणे शाळेतून स्कूल व्हॅन मधून घरी येत होती.स्कूलव्हॅन चालकाने चिमुरडीवर अत्याचार केला. घरी आल्यानंतर घाबरलेल्या अवस्थेत असलेल्या चिमुरडीने आपल्या आईवडिलांना हा प्रकार सांगितला. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. तर चिमुकलीची सध्या वैद्यकीय तपासणी सुरु असल्याची माहिती आहे.

ही घटना उघड झाल्यानंतर संबंधित स्कूल व्हॅनची तोडफोड करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला नेत्या संगीता चेंदवनकर यांच्याकडून संबंधित व्हॅनवर दगडफेक करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
