सांडपाणी योजनेतून फुरसुंगी उरुळी वगळली, पुणे महापालिकेचा झटका…!

पुणे : पुण्यात 2017 मध्ये समाविष्ट झालेल्या 11 गावांमधील सांडपाण्यावर प्रक्रीया करण्यासाठी महापालिकेकडून मांजरी येथे 93 एमएलडी क्षमतेचा प्रकल्प उभारण्यात येणार असून त्यासाठी सुमारे 350 कोटींच्या प्रकल्पाचे काम सुरू आहे. असे असताना प्रकल्पातून उरूळी देवाची आणि फुरसुंगी ही दोन्ही गावे वगळण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.


यासाठी मांजरी येथील 93 एमएलडी क्षमतेच्या प्रकल्पाची फेररचना केली जाणार असल्याची माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली. या 11 गावांमध्ये निर्माण होणाऱ्या सांडपाण्यात सर्वाधिक 60 एमएलडी सांडपाणी हे या दोन्ही गावांचे आहे. त्यामुळे, या गावांना मोठा झटका बसणार आहे.
दरम्यान, हद्दवाढ करताना उरूळी-देवाची, फुरसुंगीसह 11 गावे महापालिकेत घेण्यात आली. त्यावेळी, महापालिकेकडून शहरासाठीच्या जायका प्रकल्पास मान्यता देण्यात आली होती.
ही गावे आल्याने त्यांचे सांडपाणीही 100 टक्के संकलीत करून त्यावर प्रक्रीया करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला त्यासाठी तब्बल 350 कोटींच्या खर्चास मान्यता देऊन मागील वर्षी या प्रकल्पाचे कामही सुरू करण्यात आले.
मागील आठवड्यात गावे वगळण्यासाठी शासनाने हरकती आणि सूचना मागविलेल्या आहेत. त्यामुळे ही गावे वगळली जाणार असल्याने महापालिकेने सांडपाणी प्रकल्पाचे कामही या गावात न करण्याचा निर्णय घेतला आहे.