Bachchu Kadu : मराठे हे कुणबीच! त्यांना कुणबी नाहीत हे म्हणणं म्हणजे मुर्खपणा आहे, बच्चू कडू यांचे वक्तव्य..
Bachchu Kadu : राज्यामध्ये मराठा समाज आरक्षण मिळवण्यासाठी आंदोलन करत आहे. महाराष्ट्रातील मराठा समाजाला सरसकट पूर्वी प्रमाणपत्र द्यावे, अशी मागणी मराठा समाजाने केली आहे.
त्यांच्या या मागणीला ओबीसी नेते आणि ओबीसी समाजाने विरोध दर्शवला आहे. मराठ्यांना ओबीसी प्रमाणपत्र देणं म्हणजे मागच्या दारानं आरक्षण देण्यासारखे आहे, असे छगन भुजबळ यांनी म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्यावर आमदार बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मराठा समाजाला कुणबी म्हणून १०० टक्के आरक्षण मिळेल, असं बच्चू कडू म्हणाले. दोन्ही पद्धतीने आरक्षण मिळायला सोपं जाईल. सर्वोच्च न्यायालयात सरकार ताकदीनं बाजू मांडेल आणि ज्यांच्या कुणबी नोंदी सापडतायत, त्यांनाही आरक्षण दिलं जाईल. जे मराठा आहेत, ते कुणबी आहेत हे १०० टक्के सत्य आहे, असं बच्चू कडू म्हणाले.
मी कुणबी आहे. माझी जुनी नोंद कुणबी सापडली. मी मराठ्याचा कुणबी झालोच. पश्चिम महाराष्ट्र, मुंबई, कोकण, विदर्भातले मराठ्याचे कुणबी झाले. आता मराठवाड्यातले ५-६ जिल्ह्यातले मराठे कुणबी नाहीत हे म्हणणं म्हणजे शुद्ध मूर्खपणा आहे. मराठे हे कुणबीच आहेत हे सूर्यप्रकाशाइतकं स्वच्छ आहे, असंही ते म्हणाले. Bachchu Kadu
छगन भुजबळांकडून मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्याच्या मुद्द्यावरून आक्रमक भूमिका मांडल्याबाबत विचारणा केली असता बच्चू कडूंनी भुजबळांनाच प्रतिप्रश्न केला. भुजबळांनी आम्हाला सांगावं की मराठा कुणबी नाही तर कोण आहे? मराठा हा कुणबीच आहे.
पण काही लोक मतदानाच्या पेटीचा हिशेब करून हे मुद्दे पुढे करून राजकीय पोळी शेकण्याच्या प्रयत्नात आहेत. ते चुकीचं आहे. आता त्यावर कोर्ट निर्णय घेईल. कुणबी नोंद असेल, तर देशातल्या कुणालाही आरक्षण अडवता येणार नाही. सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळाल्याशिवाय राहणार नाही”, असा विश्वास बच्चू कडूंनी व्यक्त केला.