बच्चू कडू शिवतीर्थावर, राज ठाकरेंना थेट प्रस्ताव, नेमकं घडतंय काय?

मुंबई : आज प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीत शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा झाली. कडूंनी ठाकरेंना यवतमाळ यात्रेत सहभागी होण्याचे आवाहन केले आणि शेतकऱ्यांसाठी मुंबई बंद करण्याची मागणी केली. गेल्या काही दिवसांपासून कडू हे शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी यासाठी आग्रही आहेत.
कडू यांनी सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणाचा निषेध केला आणि आंदोलनाची तयारी दर्शवली. निवडणूक आयोगाच्या व्हीव्हीपॅट निर्णयावरही त्यांनी टीका केली. यावेळी कडू म्हणाले, आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आदरणीय राज ठाकरे यांची शिवतीर्थ निवासस्थानी भेट घेतली. या भेटीत शेतकरी प्रश्नांवर सविस्तर चर्चा झाली.
शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी होणाऱ्या आगामी आंदोलनाची दिशा, धोरणे आणि मागण्या यावर राजसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली विचारमंथन करण्यात आले. मराठवाड्यातून निघणाऱ्या कर्जमाफी यात्रेसाठी राजसाहेबांना औपचारिक आमंत्रण देण्यात आले. त्यांनी याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला. शेतकऱ्यांच्या हक्कासाठी सर्व पातळ्यांवर संघर्ष करण्याचा निर्धार या भेटीतून पुन्हा अधोरेखित झाला.
तसेच ते म्हणाले, मी राज ठाकरेंना आता यवतमाळमध्ये जी यात्रा काढली जाणार आहे, त्याचे आमंत्रण दिले. तिथे त्यांनी यावं. शेतकऱ्यांना संबोधित करावं. तसेच आमचं असं स्वप्न आहे की आम्ही अनेकदा मुंबई बंद होताना पाहिली आता ती एक दिवस शेतकऱ्यासाठी बंद राहायला हवी. तसेच किमान काही तास मुंबईने शेतकऱ्यांच्या मागे उभं राहावं.
ही देशाची आर्थिक राजधानी आहे. या देशाच्या राजधानीतूनच शेतकऱ्यांना दिलासा देणारा आवाज निर्माण व्हावा, या अपेक्षा राज ठाकरेंकडून आहेत. शेतकरी हा विषय एका जातीचा, धर्माचा किंवा पक्षाचा नाही. त्यामुळे जर मनसे सोबत आलं तर निश्चितच बळ मिळेल. आमचा अजेंडा निवडणुकीचा नव्हे तर मरणारा शेतकरी वाचवणे हा आहे. असेही ते म्हणाले.