अजित पवार यांचे निकटवर्तीय आमदार शरद पवारांच्या गटात प्रवेश करणार ! बाबाजानी दुर्राणी शरद पवार यांच्या संपर्कात ..!!
परभणी : राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आज परभणी जिल्हा दौऱ्यावर आले असून त्यांनी परभणीत येताच अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार बाबाजानी दुर्राणी यांच्या घरी जाऊन सदिच्छा भेट घेतली. रात्रीचे दहा वाजलेले असताना देखील आमदार बाबाजानी दुर्राणी यांच्या घरासमोर शेकडो कार्यकर्ते जमा होते. आमदार दुर्राणी यांच्या घरी बंद दराआड जयंत पाटील यांनी चर्चा देखील केली. त्यामुळे आमदार दुर्राणी आपल्या समर्थकांसह अजित पवारांची साथ सोडून शरद पवार गटात सहभागी होणार का? असा प्रश्न आता निर्माण होत आहे.
परभणी जिल्हा हा शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसचा देखील बालेकिल्ला आहे. पण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर अजित पवारांसोबत परभणी जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे बहुतांश नेते गेले होते. आमदार बाबाजानी दुर्राणी यांच्यासह त्यांचे सर्व समर्थक अजित पवार गटात सहभागी झाले होते. पण विधान परिषदेला आमदार दुर्राणी यांना विधान परिषदेवर पुन्हा एकदा उमेदवारी अजित पवार यांनी नाकारली. त्यामुळे मागील काही दिवसापासून आमदार बाबाजानी दुर्राणी हे नाराज असल्याचे दिसत होते. त्यामुळे राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये आलबेल नसल्याचेदिसून येत होते. त्यातच राजेश विटेकर यांना विधान परिषदेची उमेदवारी देऊन त्यांना आमदार केल्याने देखील राष्ट्रवादीत दुफळी निर्माण झाल्याचे दिसून येत होते. या पार्श्वभूमीवर जयंत पाटील यांची ही भेट महत्त्वाची मानली जात आहे. या भेटीमुळे दुर्राणी शरद पवार गटात जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.