सलमान खानमुळेच बाबा सिद्दीकींची हत्या, पोलिसांच्या आरोपपत्रातून महत्वाची माहिती आली समोर..


मुंबई  : राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्या हत्या प्रकरणात नवी माहिती समोर आली आहे. या प्रकरणी एकूण २६ आरोपींना पोलिसांनी आतापर्यंत अटक केली असून या आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल केले जाणार आहे.

सिद्दीकी यांचे पुत्र झिशान सिद्दीकी यांच्या वांद्रे पूर्वेतील कार्यालयाबाहेरच हा गोळीबार झाला होता. रात्री नऊच्या आसपास बाबा सिद्दीकी कार्यालयातील कामकाज उरकून आपल्या घराकडे निघाले होते, त्यावेळी कार्यालयाबाहेर दबा धरून बसलेल्या तीन जणांनी सिद्दीकी यांच्यावर गोळीबार केला.

बाबा सिद्दीकी यांची हत्या करण्यापूर्वी १४ एप्रिलला लॉरेन्स बिश्नोई गँगने सलमान खानच्या गॅलक्सी अपार्टमेंटच्या गॅलरीवर गोळीबार केला होता. काळवीट शिकार प्रकरणातून हा गोळीबार करण्यात आला होता. याप्रकरणी पोलिसांनी काही आरोपींना अटक केली होती.

ज्यात लॉरेन्स बिश्नोई गँगच्या अनुज थापन याचा समावेश होता. थापनला पोलिसांनी अटकही केली होती. मात्र त्याचा पोलीस कोठडीत मृत्यू झाला. त्याने आत्महत्या केल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आले. मात्र थापनच्या मृत्यू प्रकरणात बाबा सिद्दीकी यांचं कनेक्शन आहे, त्यामुळेच ही हत्या केल्याचं लॉरेन्स बिश्नोई गँगचा दावा होता. आता याला कुठेतरी पोलिसांकडून दुजोरा मिळताना दिसत आहे.

पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास केला असता, सलमान खान यांच्याशी असलेल्या संबंधांमुळेच सिद्दीकी यांची हत्या झाल्याचे आरोपपत्रात म्हटलं आहे. तसेच वांद्रे पूर्वेतील एसआरए प्रकल्पाच्या वादाशी हत्येचा काहीही संबंध नाही, असेही पोलिसांनी म्हटलं आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात २६ आरोपींविरोधातलं आरोप पत्र मकोका न्यायालयासमोर सादर केले जाणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!