Baba Siddique Murder Case : बाबा सिद्धिकीच नव्हे तर पुण्यातील नेत्याच्या हत्येचाही होता डाव, बिश्नोई गँगच्या प्लॅन B मधील भयंकर माहिती समोर…

Baba Siddique Murder Case : राज्याचे माजी मंत्री आणि अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांची १२ ऑक्टोबरला गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. मारेकऱ्यांनी बाबा सिद्दीकी यांच्या दिशेने पिस्तुलातून एकूण सहा राऊंड फायर केले होते.

यापैकी तीन गोळ्या बाबा सिद्दीकी यांच्या छातीत घुसल्या होत्या. त्यानंतर बाबा सिद्दीकी यांना जखमी अवस्थेत लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला होता.


या हत्येमागील तपास अजूनही सुरूच आहे. अनेक जणांना अटक करण्यात आली आहे. लॉरेन्स बिश्नोई गँगने हे कृत्य केल्याचे समोर आले आहे. आता या प्रकरणात अजून एक धक्कादायक खुलासा मुंबईतील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने केला आहे.
सिद्दिकी यांच्या हत्येनंतर पुण्यातील या नेत्याला सुद्धा लक्ष्य करण्यात येणार होते, असा दावा अधिकाऱ्याने केला आहे. बिश्नोई गँगेच्या प्लॅन बी मधील शूटर्सला ही जबाबदारी सोपवण्यात आली होती. Baba Siddique Murder Case
मुंबई गुन्हे शाखेने याप्रकरणात पुण्यात एक पिस्तूल जप्त केले होते. त्याआधारे ही हत्या करण्यात आली होती. सिद्दिकी यांच्या हत्येचा तपास करताना पोलिसांना बिश्नोई गँगच्या पुणे प्लॅनची माहिती मिळाली. ही माहिती संवेदनशील असल्याने पोलिसांनी या नेत्याचे नाव जाहीर केले नाही.
मुंबई पोलिसांनी याविषयीची इत्यंभूत माहिती पुणे पोलिसांना दिली आहे. पुणे पोलीस अलर्ट मोडवर आली आहे. आरोपींनी या नेत्याच्या घराची आणि परिसराची, त्याच्या कार्यालयाची रेकी केली होती की नाही, याचा तपास पोलीस करत आहेत.
