आयुष कोमकर हत्या प्रकरण ; आरोपी बंडू आंदेकरच्या आर्थिक नाड्या आवळल्या, केली मोठी कारवाई..

पुणे : पुण्यातील नानापेठेत झालेल्या टोळीयुद्ध आणि कौटुंबिक वादातून उगम पावलेल्या आयुष कोमकर खून प्रकरणात महत्त्वाची माहिती समोर आली आहे.या प्रकरणातील मुख्य आरोपी बंडू आंदेकरच्या पोलिसांनी आर्थिक नाड्या चांगल्याच आवळल्या असल्याचे समोर आले आहे.

पुण्यातील गणेश पेठेतील बेकायदेशीत मासोळी बाजारावर महापालिकेने कारवाई केली आहे. हा मासोळी बाजार बंडू आंदेकरच्या प्रमुख आर्थिक स्त्रोतांपैकी एक होता. बेकायदा मासळी बाजारातून आंदेकरला मोठा आर्थिक फायदा व्हायचा. पण आता महापालिकेने या बाजारावर कारवाई करत बंडू आंदेकरच्या आर्थिक नाड्या चांगल्याच आवळल्या आहेत. त्यामुळे त्याचा अडचणीत आणखीनच वाढ झाली आहे.

दरम्यान काही दिवसांपूर्वीच गुन्हे शाखेने आंदेकर टोळीच्या म्होरक्या असलेल्या बंडू आंदेकरच्या घरावर रेड टाकली. पोलिसांनी तब्बल ६७ लाखांचे सोन्याचे दागिने, चांदी, २ लाख ५० हजार रुपयांची रोकड, एक अलिशान मोटार कार, विविध करारनामे आणि कर भरल्याच्या पावत्या, असा मोठा मुद्देमाल जप्त केले. त्यानंतर आता बेकायदेशीर मासळी बाजार वर कारवाई करत मोठा धक्का दिला आहे.

अशातच काल (15 ऑगस्ट) झालेल्या सुनावणीमध्ये प्रकरणातील आरोपी बंडू आंदेकरच्या कुटुंबियांनी पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. पोलिसांनी अनेक धमक्या दिल्या असल्याचे आंदेकर कुटुंबीयांनी आरोप केला. माझ्या मुलाला कृष्णा आंदेकरला पोलीस ठाण्यात हजर राहण्यास सांगितले होते. जर तो आला नाही तर त्याचा एन्काऊंटर करु अशी धमकी पोलिसांनी दिल्याचे आंदेकर कुटुंबीयांनी म्हटले. त्यानंतर आता महापालिकेने केलेल्या कारवाईमुळे आंदेकरला मोठा आर्थिक फटका बसला आहे.
