Ayodhya Ram Mandir : अयोध्येत राम मंदिरात स्थापन होणारी मूर्ती ठरली! ‘या’ शिल्पकाराने साकारलेल्या रामलल्लाच्या मूर्तीची निवड, जाणून घ्या..
Ayodhya Ram Mandir : अयोध्येत २२ जानेवारी रोजी रामललाच्या मूर्तीचा भव्य अभिषेक सोहळा पार पडणार आहे. अयोध्येत उभारण्यात येत असलेल्या भव्य राम मंदिराती रामललाच्या मूर्तीचा अभिषेक २२ जानेवारीला होणार आहे.
त्यापूर्वी प्रभू रामाच्या तीन पैकी एका मूर्तीची निवड करण्यात आली आहे. देशातील प्रसिद्ध शिल्पकार अरुण योगीराज यांनी बनवलेल्या प्रभू श्रीराम, सीता आणि हनुमानाच्या मूर्तींची निवड करण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी ‘ट्विटर’वर यासंदर्भात माहिती दिली आहे. Ayodhya Ram Mandir :
प्रल्हाद जोशी यांनी एक्सवर (ट्वीट) लिहिले आहे की, ‘जिथे राम आहे, तिथे हनुमान आहे. अयोध्येत प्रभू रामाच्या अभिषेकासाठी या मूर्तीची निवड करण्यात आली आहे. प्रसिद्ध शिल्पकार अरुण योगीराज यांनी बनवलेल्या रामाच्या मूर्तीची अयोध्येत प्रतिष्ठापना होणार आहे. राम आणि हनुमान यांच्या अतूट नात्याचे हे प्रतिक आहे. हनुमानाची भूमी असलेल्या कर्नाटकातील अरुण यांनी रामललाची मूर्ती साकारणे ही एक महत्त्वाची सेवा आहे.
अयोध्येत निर्माणाधीन प्रभू श्रीराम मंदिराचा अभिषेक सोहळा २२ जानेवारीला होणार आहे. या सोहळ्यासाठी अयोध्येतील प्रशासन आणि सरकार पूर्णपणे गुंतलं आहे. दुसरीकडे, राम मंदिरात अभिषेक करण्यासाठी तीन मूर्तींपैकी एकाची निवड केली जाणार होती. आता या मूर्तींची निवड करण्यात आली आहे.
केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी अयोध्येतील प्रभू श्रीरामाच्या मूर्तीचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. मात्र या मूर्तीची राम मंदिरात प्रतिष्ठापना केली जाणार की नाही, याबाबत अद्याप कोणतीही स्पष्ट माहिती मिळालेली नाही. अरुण योगीराजांच्या मूर्तीची केवळ निवड करण्यात आली आहे
मूर्तीकार योगीराज कोण आहेत?
योगीराज हे सर्वपरिचित नाव असून सोशल मीडियावर त्यांचे खूप मोठे चाहते आहेत. प्रसिद्ध शिल्पकार योगीराज शिल्पी यांचे ३७ वर्षीय अरुण योगीराज पूत्र आहेत. म्हैसूर राजवाड्यातील कारागीरांच्या कुटुंबातून ते येतात. अरुणच्या वडिलांनी गायत्री आणि भुवनेश्वरी मंदिरांसाठीही काम केले आहे.
एमबीएचे शिक्षण घेतलेले योगीराज हे पाचव्या पिढीतील शिल्पकार आहेत. एमबीएची पदवी पूर्ण केल्यानंतर त्यांनी एका खासगी कंपनीत नोकरी केली. परंतु, २००८ मध्ये शिल्पकार बनण्यासाठी त्यांनी नोकरी सोडली. महाराजा जयचमराजेंद्र वोडेयार यांच्यासह अनेक व्यक्तिमत्त्वांचे पुतळे बनवले.
केदारनाथ येथे स्थापित आदी शंकराचार्यांचा पुतळा तयार करण्याबरोबरच, योगीराज यांनी महाराजा जयचमराजेंद्र वोडेयर यांचा १४.५ फूट पांढरा संगमरवरी पुतळा तयार केला आहे. महाराजा श्री कृष्णराजा वाडेयर-चतुर्थ आणि म्हैसूरमधील स्वामी रामकृष्ण परमहंस यांचा पांढरा संगमरवरी पुतळाही त्यांनी तयार केला आहे. अरुण यांनी इंडिया गेटवर नेताजी सुभाषचंद्र बोस यांचाही पुतळा साकारला आहे.