वाहनधारकांनो लक्ष द्या! 10 एप्रिलपासून FASTag संदर्भात नवीन नियम लागू, जाणून घ्या…

पुणे : हायवेवरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. देशातील टोल वसुली व्यवस्थेत मोठा बदल करण्यात आला असून 10 एप्रिलपासून टोल नाक्यांवर रोख रक्कम स्वीकारणे पूर्णपणे बंद केले जाणार आहे.

हा निर्णयनॅशनल हायवे ऑथॉरिटीने घेतला असून टोल वसुली पूर्णपणे डिजिटल करण्यावर भर दिला जात आहे. त्यामुळे वाहनधारकांना आता टोल भरण्यासाठी डिजिटल पद्धतीचाच वापर करावा लागणार आहे.
या निर्णयानंतर टोल प्लाझावर प्रामुख्याने FASTag द्वारे टोल भरता येणार आहे. जर एखाद्या वाहनात फास्टॅग नसेल किंवा तो कार्यरत नसेल, तर चालकाला Unified Payments Interface च्या माध्यमातून टोलची रक्कम भरावी लागेल. या बदलामुळे टोल प्लाझांवरील रांगा कमी होतील आणि महामार्गावरील वाहतूक अधिक सुरळीत होईल, असा दावा प्रशासनाने केला आहे.

नवीन नियमांनुसार आता वाहनात सक्रिय फास्टॅग नसल्यास चालकाला टोल भरण्यास UPI द्वारे सुविधा दिली जाईल. मात्र, अशा परिस्थितीत सामान्य टोल रकमेपेक्षा सुमारे 25% जास्त शुल्क लागू होईल. त्यामुळे नियमित महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनधारकांसाठी फास्टॅग हा सर्वात सोपा आणि स्वस्त पर्याय मानला जात आहे.
तसेच, जर एखाद्या चालकाने फास्टॅग किंवा UPI द्वारे टोल भरण्यास नकार दिला, तर टोल कर्मचारी त्याचे वाहन पुढे जाण्यापासून थांबवू शकतात. अशा परिस्थितीत संबंधित वाहनधारकाला ई-नोटीस पाठवली जाऊ शकते. नोटीस मिळाल्यानंतर तीन दिवसांत रक्कम भरण्यासाठी कारवाई केली नाही, तर टोलची रक्कम दुप्पट करण्याची तरतूद देखील आहे. हे नियम वाहनधारकांनी नियमित महामार्गावर सुरक्षित आणि जलद प्रवास सुनिश्चित करण्यासाठी लागू केले आहेत.
दरम्यान, या निर्णयासोबत आणखी एक महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. यापुढे खासगी वाहनांमध्ये सरकारी ओळखपत्र दाखवून टोलमधून सूट घेण्याची सुविधा बंद केली गेली आहे. आता फक्त अधिकृतरीत्या टोलमधून सूट मंजूर केलेल्या वाहनांनाच टोल न भरता पुढे जाण्याची परवानगी दिली जाईल.