विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! उन्हाळ्याची सुट्टी कधी लागणार? शाळा कधी सुरू होणार? अखेर शिक्षण विभागाने जाहीर केलं संपूर्ण वेळापत्रक

पुणे : उन्हाळ्याच्या सुट्ट्यांची ओढ प्रत्येक विद्यार्थ्याला लागलेली असते. मामाच्या गावाला जाऊन धमाल करणे किंवा आई-बाबांसोबत फिरायला जाण्याचा आनंद काही वेगळाच असतो.

मात्र यावर्षी विद्यार्थ्यांची थोडी निराशा होण्याची शक्यता आहे. दरवर्षीप्रमाणे १० ते १५ एप्रिलदरम्यान सुरू होणारी उन्हाळ्याची सुट्टी यंदा उशिरा मिळणार असून, ती थेट २ मेपासून सुरू होणार आहे. तसेच १ मे रोजी निकाल लागल्यानंतर विद्यार्थ्यांची उन्हाळ्याची सुट्टी सुरू होणार आहे, तर जून महिन्यात पुन्हा शाळा सुरू होतील. यंदा मात्र सुट्ट्यांचा कालावधी तुलनेने कमी असणार आहे.
परीक्षांचा ताण संपल्यानंतर आता विद्यार्थ्यांना आंबा, सुट्टी आणि मामाच्या गावाचे वेध लागले आहेत. दरम्यान, शिक्षण विभागाने उन्हाळी सुट्ट्यांचे अधिकृत वेळापत्रक जाहीर केले असून, राज्यातील सर्व शाळांना २ मेपासून सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मात्र यंदाच्या सुट्ट्यांमध्ये एक महत्त्वाचा बदल करण्यात आला असून, विशेषतः विदर्भातील शाळा आणि पालकांसाठी तो लक्षवेधी ठरणार आहे.

राज्य मंडळाशी संलग्न असलेल्या सर्व प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांना यंदा २ मेपासून अधिकृत उन्हाळी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, २०२६–२७ या नव्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात १५ जूनपासून होणार असून, त्या दिवशी पुन्हा शाळेची घंटा वाजणार आहे.
आत्तापर्यंतचा अनुभव पाहता, विदर्भातील तीव्र उन्हाळा लक्षात घेऊन तेथील शाळा इतर भागांच्या तुलनेत साधारण आठवडाभर उशिरा सुरू होत असत. मात्र, यंदा शिक्षण संचालनालयाने सुट्ट्यांच्या कालावधीत एकसंधता आणण्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
यानुसार, आता मुंबई-पुण्यासोबतच नागपूर आणि गडचिरोलीतील शाळाही १५ जूनपासूनच सुरू होणार आहेत. तसेच, एखाद्या शाळेला स्थानिक सणांसाठी अतिरिक्त सुट्ट्या घ्यायच्या असतील, तर त्या बदल्यात उन्हाळी सुट्टीत कपात करावी लागणार आहे.
शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे की, शाळांना २ मेपासून उन्हाळी सुट्टी जाहीर असली तरी शिक्षकांना निकालाशी संबंधित कामे आणि पुढील शैक्षणिक वर्षाचे नियोजन पूर्ण करावे लागणार आहे.
तसेच, ज्या शाळांना उन्हाळ्याऐवजी इतर सणांसाठी अधिक सुट्ट्या घ्यायच्या असतील, त्यांनी संबंधित शिक्षण अधिकाऱ्यांची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक राहणार आहे. मात्र, कोणत्याही परिस्थितीत एकूण सुट्ट्यांचा कालावधी ७६ दिवसांपेक्षा अधिक होणार नाही, याची दक्षता शाळांनी घेणे बंधनकारक आहे.