पुणेकरानो लक्ष द्या! उद्या १९ फेब्रुवारीला शहरातील वाहतुकीत मोठे बदल, ‘या’ पर्यायी मार्गांचा करा वापर…

पुणे : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त गुरुवारी (१९ फेब्रुवारी) पुणे शहरात विविध मिरवणुका आणि भव्य कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर शहराच्या मध्यवर्ती भागातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आणि मिरवणुका शांततेत पार पडण्यासाठी शहर वाहतूक शाखेकडून वाहतुकीत तात्पुरते बदल करण्यात आले आहेत.

काही प्रमुख रस्त्यांवर तात्पुरते निर्बंध लावण्यात आले असून वाहनचालकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दरवर्षी उत्साहात साजरी होणारी छत्रपती शिवाजी महाराज जयंती यंदाही जल्लोषात पार पडणार आहे. शहरातील प्रमुख भागांतून मिरवणुका निघणार असल्याने वाहतुकीवर ताण येण्याची शक्यता आहे.
या पार्श्वभूमीवर लक्ष्मी रस्ता, छत्रपती शिवाजी महाराज रस्ता, बाजीराव रस्ता, कुमठेकर रस्ता आणि केळकर रस्ता या मार्गांवरील वाहतूक तात्पुरती वळवण्यात आली आहे. या परिसरात जड वाहनांना पूर्णतः मनाई करण्यात आली आहे.

वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त हिम्मत जाधव यांनी नागरिकांनी शक्यतो खाजगी वाहनांचा वापर टाळावा, असे आवाहन केले आहे. 19 फेब्रुवारी रोजी सकाळी 7 वाजल्यापासून सायंकाळपर्यंत, गर्दी ओसरत नाही तोपर्यंत हे बदल कायम राहतील. त्यामुळे शहरातील नागरिकांनी प्रवासाचे नियोजन आधीच करून ठेवावे, असे सूचित करण्यात आले आहे.
असे असतील वाहतुकीचे पर्यायी मार्ग…
शिवाजी महाराज रस्ता – जिजामाता चौकातून शिवाजी महाराज रस्त्याने जाणाऱ्यांनी स. गो. बर्वे चौकातून जंगली महाराज रस्ता – खंडोजीबाबा चौक आणि टिळक रस्त्याचा वापर करावा.
गणेश रस्ता – दारूवाला पुलाकडून फडके हौद चौकाकडे येणारी वाहतूक दारूवाला पूल चौकातूनच वळविण्यात येईल.
बाजीराव रस्ता – पूरम चौकातून बाजीराव रस्त्याने शिवाजीनगरकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी टिळक रस्ता – अलका टॉकीज आणि फर्ग्युसन रस्त्याने पुढे जावे.
अप्पा बळवंत चौक – केळकर रस्त्याने अप्पा बळवंत चौकातून बुधवार चौकाकडे जाणारी वाहतूक मिरवणूक संपेपर्यंत वळविली जाईल. मिरवणूक सुरू असताना वाहनचालकांनी केळकर रस्त्याने सरळ पुढे जाणे अपेक्षित आहे.
लक्ष्मी रस्ता – मिरवणूक सोन्या मारुती चौकात असेपर्यंत संत कबीर चौकातून वाहने वळविली जातील.
बालगंधर्व परिसर – मिरवणूक गाडगीळ पुतळा चौकाच्या पुढे जाईपर्यंत सर्व वाहने सावरकर भवन पुलावरून बालगंधर्व रंगमंदिराच्या दिशेने सोडली जातील.
दरम्यान, आपत्कालीन सेवांना मात्र या बदलांतून सूट देण्यात आली आहे. रुग्णवाहिका, अग्निशमन दल आणि इतर तातडीच्या सेवांच्या वाहनांना प्राधान्याने मार्ग दिला जाणार आहे. प्रशासन आणि वाहतूक पोलिसांनी नागरिकांना सहकार्य करण्याचे तसेच नियोजनपूर्वक प्रवास करण्याचे आवाहन केले आहे.