आरपीआयची महिला नेता असल्याची धमकी देऊन 2 गुंठे जमीन हडपण्याचा प्रयत्न; लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल…

लोणी काळभोर : आरपीआयची महिला नेता असल्याची धमकी देऊन एका व्यवसायिकाच्या २ गुंठे जमिनीवर ताबा टाकून ती हडपण्याचा प्रयत्न करण्टयाची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर घटना हवेली तालुक्यातील लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीतील गट क्रमांक १६९३ मध्ये बुधवार (२४ डिसेंबर) रोजी दुपारी अडीच ते साडेचार या दरम्यान घडली आहे. या घटनेमुळे लोणी काळभोर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार याप्रकरणी हजीलाल शब्बीर शेख (वय ४५, रा. मंत्री मार्केट, हडपसर, पुणे) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रुपाली महादेव काळभोर, अशोक आणाराव सुर्यवंशी व प्रितम सावंत (सर्व राहणार, लोणी काळभोर ता हवेली जि पुणे) यांचेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सन २०१९ मध्ये हजीलाल शेख व त्यांच्या सहकाऱ्यांनी भाऊसाहेब फुले यांच्याकडून जमीन खरेदी केलेली आहे. या जमीनीची क प्रत तयार करुन सदर जमीनीला सिमेंटचे कंम्पाऊन्ड केले आहे. ही जमीन गेल्या सात वर्षापासून शेख यांच्या ताब्यात आहे.
बुधवारी दुपारी पावणे तीन वाजण्याच्या सुमारांस रुपाली काळभोर, अशोक सुर्यवंशी व प्रितम सावंत हे हजीलाल शेख यांच्या जमिनीजवळ आले. आणि शिवीगाळ करुन हि गायरान जमीन आहे. तुम्ही परत येथे पाय ठेवायचा नाही. तुम्ही पुन्हा जर या ठिकाणी आलात तर मी तुमच्या विरुध्द खोटा गुन्हा दाखल करेल व तुम्हाला आडकवेल. मी आरपीआय ची खुप मोठी नेता आहे असे म्हणुन धमकी दिली. तसेच शेख यांच्या जमिनीवर अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केला आहे.
याप्रकरणी हजीलाल शेख यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार वरील तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पूजा माळी करत आहेत.
