पुण्यात बिबट्याची झडप! धावत्या दुचाकीवर हल्ला; तरुणाचं नियंत्रण सुटलं अन्…,घटनेने उडाली खळबळ

पुणे : पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात बिबट्याची दहशत दिवसेंदिवस वाढत असून आता ती थेट जीवघेणी ठरू लागली आहे. मंचरजवळील चांडोली-लौकी रस्त्यावर रात्रीच्या वेळी घडलेल्या एका थरारक घटनेने परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

दुचाकीवरून घरी परतत असलेल्या दोन तरुणांवर अचानक बिबट्याने झडप घालत भीषण हल्ला केला. या हल्ल्यात एक तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्या मित्राने प्रसंगावधान राखत धाडसाने परिस्थिती हाताळली. त्याच्या तत्परतेमुळे दोघेही मृत्यूच्या दाढेतून थोडक्यात बचावले. या घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे.
मिळालेल्या माहिती नुसार, लौकी गावचे रहिवासी किरण नवनाथ थोरात आणि त्यांचा मित्र पीयूष शंकर थोरात हे दोघे रात्री उशिरा पल्सर दुचाकीवरून मंचरहून आपल्या गावाकडे परतत होते. चांडोली पार करून ते लौकी रस्त्यावरील पाण्याच्या टाकीजवळ पोहोचताच अचानक एक थरारक प्रसंग घडला. रस्त्याच्या कडेला असलेल्या उसाच्या दाट शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने क्षणार्धात दुचाकीवर झडप घातली.

या अचानक झालेल्या हल्ल्यात किरण थोरात यांच्या हाताला आणि पाठीच्या डाव्या बाजूला बिबट्याच्या धारदार नखांनी गंभीर जखमा केल्या. हल्ल्याच्या धक्क्याने दुचाकीचा तोलही गेला, मात्र अपार धैर्य दाखवत किरण यांनी गाडीवर नियंत्रण मिळवलं आणि मोठ्याने आरडाओरडा सुरू केला.
दरम्यान, बिबट्या पुन्हा हल्ला करण्याच्या तयारीत असतानाच किरण यांनी प्रसंगावधान राखत दुचाकी वेगाने पुढे घेतली आणि तिथून सुटका केली. या जीवघेण्या प्रसंगात पीयूष थोरातही थोडक्यात बचावला. या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
लौकी गावात पोहोचताच या दोघांनी अनुभवलेला थरार ग्रामस्थांना सांगितला, त्यामुळे गावात एकच खळबळ उडाली. जखमी अवस्थेत असलेल्या किरण थोरात यांना तत्काळ मंचर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच वनविभागाने तातडीने हालचाल केली. वनरक्षक संपत तांदळे आणि वनसेवक जालिंदर थोरात यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली आणि परिस्थितीचा आढावा घेतला. या घटनेनंतर परिसरात भीतीचं वातावरण अधिकच गडद झालं आहे.
उसाच्या दाट शेतांमुळे या परिसरात बिबट्यांचा वावर वाढल्याचे स्पष्ट होत असून त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर वनविभागाने नागरिकांना विशेष सतर्कतेचा इशारा दिला आहे.
नागरिकांना आवाहन..
रात्रीच्या वेळी एकटे प्रवास टाळावा, आवश्यक असल्यास समूहानेच बाहेर पडावे आणि सतत जागरूक राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. बिबट्याच्या हालचाली लक्षात घेता कोणतीही संशयास्पद हालचाल दिसल्यास तात्काळ वनविभागाला कळवण्याचेही आवाहन अधिकाऱ्यांनी केले आहे.