एक लाखाची लाच स्वीकारताना सहायक पोलीस निरीक्षक व सहायक पोलीस उपनिरीक्षक अँन्टी करप्शनच्या जाळ्यात..

सातारा : परमिट रुममधुन दारुची अवैध वाहतूक केल्यामुळे पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात मदत करण्यासाठी दीड लाख रुपये लाचेची मागणी करुन एक लाख रुपये लाच स्वीकारताना खटाव तालुक्यातील औंध पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक व सहायक पोलीस उपनिरीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहाथ पकडले.
सातारा एसीबीच्या पथकाने ही कारवाई खटाव तालुक्यातील औंध येथील जुना एसटी स्टँड, बाजार पटांगणात केली. या कारवाईमुळे सातारा पोलीस दलात खळबळ उडाली आहे.
सहायक पोलीस निरीक्षक दत्तात्रय परशुराम दराडे, सहायक पोलीस उपनिरीक्षक बापुसाहेब नारायण जाधव (वय ५४) असे लाच घेताना पकडण्यात आलेल्या दोन पोलीस अधिकाऱ्यांची नावे आहेत. याप्रकरणी ४२ वर्षीय व्यक्तीने सातारा एसीबीकडे तक्रार केली होती.
मिळालेल्या माहिती नुसार, तक्रदार यांच्या परमिट रुम मधुन दारुची अवैध वाहतूक केल्याप्रकरणी औंध पोलीस ठाण्यात गुन्ह दाखल आहे. दाखल गुन्ह्यात तक्रारदार यांना मदत करण्यासाठी व त्यांच्या व्यवसायात इथुन पुढे कोणताही त्रास न देण्यासाठी औंध पोलीस ठाण्यातील एपीआय दत्तात्रय दराडे आणे एएसआय बापुसाहेब जाधव यांनी दीड लाख रुपये लाचेची मागणी केली. तडजोडी अंती एक लाख रुपये देण्याचे ठरले.
तक्रारदार यांना लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी सातारा एसीबी कार्यालयात तक्रार केली. प्रप्त तक्रारीची पडताळणी केली असता दराडे आणि जाधव यांनी दीड लाख रुपये लाचेची मागणी कडून तडजोडी अंती एक लाख रुपये स्वीकारण्याचे मान्य केल्याचे निष्पन्न झाले. लाचेची रक्कम औंध येथील जुना एसटी स्टँड येथील बाजार पटांगणात देण्याचे ठरले.
त्यानुसार पथकाने बाजार पटांगणात सापळा रचला. एपीआय दत्तात्रय दराडे यांच्यावतीने एएसआय बापुसाहेब जाधव यांना एक लाख रुपये लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. दोघांवर औंध पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमाखाली गुन्हा दाखल केला आहे.