महिलेची छेडछाड करणारा सराईत गुन्हेगार अस्लम शेख गजाआड

लोणी काळभोर : मुलीबरोबर झालेल्या किरकोळ वादाचा राग काढत ४६ वर्षीय महिलेला शिवीगाळ, मारहाण व जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली आहे. ही घटना शुक्रवार (२७ फेब्रुवारी) रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास घडली आहे. गुन्हा दाखल होताच, लोणी काळभोर पोलिसांनी आरोपीला तत्काळ अटक केली आहे.याप्रकरणी एका महिलेने पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अस्लम अन्वर शेख (वय २५, रा. जयहिंद नगर वस्ती, कदमवाकवस्ती, ता. हवेली, जि. पुणे) याला अटक करण्यात आली आहे.

पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,आरोपी अस्लम शेख हा हमाली करतो. फिर्यादी व आरोपी हे दोघे एकमेकांच्या ओळखीचे आहेत. फिर्यादी यांची मुलगी आणि आरोपी अस्लम शेख यांच्यामध्ये भांडणे झाली होती. शुक्रवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास फिर्यादी या दोन मुलींसह घरी होत्या. त्यावेळी मुलीसोबत झालेल्या भांडणाचा राग मनात धरून शेख हा घराजवळ आला व घाणेरडी शिवीगाळ करत फिर्यादी यांना हाताने मारहाण केली तसेच “जिवंत सोडणार नाही” अशी धमकी दिली. याचवेळी अश्लील शब्दांचा वापर करून तिच्या स्त्रीमनाला लज्जा वाटेल असे वक्तव्य केले.
याप्रकरणी संबंधित महिलेने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अस्लम अन्वर शेख याच्याविरोधांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी वेगाने कारवाई करत आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. आरोपी अस्लम शेख हा यापूर्वीही गुन्हेगारी प्रवृत्तीचा असून पोलीस ठाणे अभिलेखावरील गुन्हेगार आहे. त्यामुळे परिसरात संतापाची लाट उसळली आहे.
