आ. अशोक पवारांनी विधानसभेच्या अधिवेशनात शिरूर- हवेली तालुक्यातील विविध प्रश्नांनवर वेधले सरकारचे लक्ष…!
उरुळी कांचन : मुंबई येथे विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असून चौथ्या दिवशी आमदार अशोक पवार यांनी 2022-23 च्या पुरवण्या मागण्यांवर चर्चा करीत असताना शिरूर-हवेली विधानसभा मतदारसंघातील विविध प्रश्नांबाबत आवाज उठविला आहे .कांद्याला मिळणार्या कमी भावावर सरकारने योग्य त्या उपाययोजना कराव्यात. शिरूर तालुक्यातील बिबट्याचे वाढते प्रमाण, हल्ले यावर सरकारने दिवसा वीज द्यावी तसेच शिरूर तालुक्यात कृषी सहायक पदांची भरती करावी अशी मागणी आ.अशोक पवार यांनी केली आहे.
त्याचबरोबर नवीन कृषी भवन बांधण्याची संकल्पना मांडली. शेतकरी अपघात विमा, ऊस पिकासाठी हार्वेस्टरला अनुदान वाढविण्यात यावे. कांदा चाळ अनुदान वाढवावे, पीककर्जाचा परतावा मिळावा, शेतकरी अपघात योजनेत कुटुंबातील घटक म्हणून सुनेचा ही समावेश करावा, पशूसंवर्धन दवाखाने ग्रामीण भागात स्थलांतर करावेत. पुणे नगर महामार्गावर सहा पदरी पूल मंजूर आहे त्या कामास गती देण्यात यावी. शिरूर तालुक्याला गेल्या काही दिवसांपासून तहसीलदार मिळत नाही याविषयी आमदार अशोक पवार यांनी नाराजी व्यक्त केली.
तालुक्यातील तहसील कार्यालय इमारत रंगरंगोटीसाठी निधी, विठ्ठलवाडी ते सांगवी सांडसदरम्यान पुलाची मागणी तसेच कोरेगाव मूळ येथे ही मुळा-मुठा नदीवर पुलाची मागणी केली तसेच वाघोली व उरुळी कांचन या वाढत्या शहरांची लोकसंख्या पाहता स्वतंत्र पोलिस स्टेशन निर्मिती करावी. ज्या ज्या कामांना स्थगिती देण्यात आली आहे त्या कामाची स्थगिती उठवावी, अशी मागणी आमदार अशोक पवार यांनी केली आहे.