पुण्यात अशोक खरातच्या CA ची अफाट ‘माया ‘! तब्बल 49 गुंठे जमीन अन् 18 रो हाऊस, मालमत्ता आता SIT च्या रडारवर

पुणे: नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरातचे अनेक कारनामे उघडकीस येत असताना आता त्याचा विस्तार पुण्यातील सर्वात पॉश समजल्या जाणाऱ्या कोरेगाव पार्कपर्यंत पोहोचल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. खरातचा सीए प्रकाश पोफळे याची पुण्यातील अफाट संपत्ती आता एसआयटीच्या रडारवर आली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, अशोक खरातचा सीए प्रकाश पोफळे,याने 2024 मध्ये कोरेगाव पार्क परिसरात तब्बल 18 रो-हाऊसेस आणि 48 गुंठे जागा खरेदी केल्याचे पुरावे एसआयटीच्या हाती लागले आहेत. कागदोपत्री या व्यवहाराची किंमत 19 कोटी 56 लाख रुपये दाखवण्यात आली असली, तरी बाजारभावानुसार या मालमत्तेची किंमत 100 कोटी रुपयांहून अधिक असल्याची माहिती समोर आली आहे.
या सर्व प्रकारानंतर प्रकाश पोकळे यांच्याकडे एवढी मोठी रक्कम आली कुठून?अशोक खरातच्या माध्यमातून काळा पैसा पांढरा करण्याचे व्यवहार सुरू होते का? या सर्व व्यवहारांमध्ये खरात चा थेट किंवा अप्रत्यक्ष संबंध आहे का या सर्व बाबींशी सखोल चौकशी आता विशेष तपास पथकाकडून केली जाण्याची शक्यता आहे.

तसेच कोरेगाव पार्कच्या लेन नंबर ३ मध्ये, जिथे बड्या उद्योगपतींचे बंगले आहेत, तिथे एका सीएने इतकी मोठी मालमत्ता खरेदी करण्यासाठी पैसे कुठून आणले? हा महत्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. या प्रकरणात लवकरच काही मोठे खुलासे होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.