Pune Crime एकतर्फी प्रेमात झाला अंधळा! केक घेतला नाही म्हणून घरात घुसला अन्,…; तरुणाचे संतापजनक कृत्य..
पुणे : एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या एका तरुणाने तरुणीवर हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात समोर आला आहे. ही घटना कोंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका उच्चभ्रू सोसायटीत गुरुवार (ता.२४) रात्री घडली आहे.
अंकित सिंग (वय. ३१) या तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी तीस वर्षीय तरुणीने या प्रकरणी फिर्याद दिली आहे.
मिळालेल्या माहिती नुसार, फिर्यादी आणि आरोपी एकमेकांच्या ओळखीचे आहेत. आरोपींनी फिर्यादीला अनेक वेळा माझे तुझ्यावर प्रेम आहे असे म्हणत तुझ्यासोबत जवळीक साधण्याचा प्रयत्न केला होता. मात्र फिर्यादीने त्याला नकार दिला होता.
त्याचा नंबर ब्लॉक केला तरी वेगवेगळ्या मोबाईल नंबरवरून तो संपर्क साधायचा. दरम्यान फिर्यादीचा वाढदिवस असल्याने आरोपीने गुरुवार (ता.२४) रात्री तिच्या घरी कुरिअरने केक पाठवला होता. मात्र फिर्यादीने तो केक घेतला नाही.
त्यानंतर आरोपीने फिर्यादी तरुणी राहत असलेल्या सोसायटीमध्ये पोहोचला. सोसायटीमध्ये शिरताच तरुणाने सुरक्षारक्षकांसोबत वाद घातला आणि फिर्यादीच्या घरात जबरदस्तीने घुसला. त्यावेळी तरुणाने फिर्यादीला मारहाण करण्याचा देखील प्रयत्न केला.
या झटापटीत फिर्यादीच्या अंगावरील कपडे ओढले गेल्याने तिच्या मनाला लज्जा उत्पन्न झाली. या सगळ्या प्रकारानंतर तरुणीने पोलीस ठाणे गाठत आपली तक्रार नोंदवली आहे. कोंढवा पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.