अरुण गवळीच्या मुलाला कोर्टाचा दणका ;’ तो ‘जामीन अर्ज फेटाळला, नेमकं प्रकरण काय?

मुंबई: गुन्हेगारी जगतातून राजकारणाकडे वळलेल्या ‘डॅडी’ अरुण गवळीचा मुलगा महेश गवळीचा जामीन अर्ज मुंबई सत्र न्यायालयाने फेटाळला आहे.जमीन व्यवहारातील फसवणूक प्रकरणात त्याला हा दणका बसला आहे. त्यामुळे त्याच्या अडचणीत मोठी वाढ होणार आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, महेश गवळी याने एका महिलेची एक कोटी रुपयांहून अधिक रकमेची फसवणूक केल्याच्या आरोपावरून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर महेश गवळी यांनी तातडीने अटक टाळण्यासाठी सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. तथापि, अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर. एस. आराध्ये यांनी हा अर्ज नामंजूर केला आहे. त्याच्या निर्णयामुळे आता महेश गवळी उच्च न्यायालयात धाव घेणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटलं की, तक्रारदार आणि महेश गवळी यांच्यात थेट संबंध असल्याचा कोणताही ठोस प्राथमिक पुरावा सध्या नसला तरी, तपास प्रक्रियेत महेश गवळी यांनी पोलिसांना सहकार्य केले नाही. तपासात सहकार्य न करण्याची ही वृत्तीच त्यांना अटकपूर्व जामीन नाकारण्याचे प्रमुख कारण ठरली, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले आहे.

दरम्यान न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यामुळे, महेश गवळी यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. पोलीस त्यांना कोणत्याही क्षणी अटक करण्याची शक्यता आहे. सत्र न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळल्यानंतर आता महेश गवळी उच्च न्यायालयात धाव घेणार का? हे पाहणं महत्त्वाचं असेल.
