जोगवा मागु देत नाही या कारणांवरून तृतीयपंथीयांमध्ये वाद; दोघांना मारहाण, ५ जणांवर लोणीकाळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…

लोणी काळभोर : किन्नर असल्याला विरोध करते, मला जोगवा मागु देत नाहीस यावरून दोन तृतीयपंथीयांमध्ये झालेल्या वादाचे पर्यावसन भांडणात झाल्याने दोन तृतीयपंथीयांना मारहाण झाली आहे. याप्रकरणी ५ जणांच्या विरोधात लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी मोनिका राजेंद्र दोडक (वय ३६, रा. लक्ष्मी नगर पोलीस चौकी समोर, येरवडा, पुणे) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तुषार उर्फ लल्या (रा. प्रथमा
बिल्डींग, रामटेकडी, पुणे) व त्याचे अनोळखी ३ ते ४ इसमांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना हवेली तालुक्यातील कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीतील कदमवस्ती परिसरातील इच्छापुर्ती काळुबाई मंदिराच्या समोर शनिवार (१५ नोव्हेंबर) रोजी पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास घडली आहे.

पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवार (१४ नोव्हेंबर) रोजी रात्री तृतीयपंथीं मोनिका दोडक या रिक्षामध्ये बसुन बहीण स्विटी अंबिका सिंगला भेटण्याकरीता निघाल्या होत्या. हडपसर गाडीतळ येथे मोनिका व स्विटी सिंग यांची भेट झाली. त्यानंतर दोघी स्विटीच्या कदमवाकवस्ती येथील घरी गेल्या. रात्री दोन वाजण्याच्या सुमारास बाहेर भांडण झाल्याचा आवाज आल्याने स्विटीने घराचे बाहेर येवून पाहिले. तेव्हा त्याठिकाणी मोनिका यांच्या ओळखीचा इसम तुषार उर्फ लल्या व त्याच्यासोबत अनोळखी ३ ते ४ आले होते.
त्यावेळी लल्या हा स्विटीला म्हणाला की, तु माझ्या किन्नर असल्याला विरोध करत आहेस, मला जोगवा मागु देत नाहीस, माझी बदनामी करीत आहे, तु माझ्या वाटेला जावु नकोस, तु माझ्या वाटेमध्ये आलीस तर मी तुला जीवे ठार मारणार अशी धमकी दिली. त्यावेळी मोनिका या लल्याला म्हणाल्या, तु असं का बोलतोय? तेव्हा त्याने मोनिकाला देखील जिवे मारण्याची धमकी दिली.
त्याने हातामधील लोखंडी हत्यार अंगावर उगारले. तर त्याच्यासोबतच्या साथीदारांनी स्वीटी व मोनिका यांना हाताने व लाथाबुक्यांनी मारहाण केली. या मारहाणीमध्ये मोनिका यांना छातीला, पाठीवर व उजवे हाताला मारहाण झाली असुन त्यांची बहीण स्विटी हिस पोटामध्ये, छातीला व पाठीला मारहाण करुन दुखापत झाली आहे.
याप्रकरणी मोनिका यांनी आरोपींच्या विरोधात लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अनिल जाधव करत आहेत.
मोनिका व स्वीटी यांना मारहाण झाल्यानंतर तृतीयपंथीयांनी आरोपी तुषार उर्फ लल्या व त्याच्या सहकाऱ्यांवर गुन्हा दाखल करून त्वरित अटक करावी. यासाठी ३० पेक्षा अधिक तृतीयपंथीयांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात शनिवारी (१५ नोव्हेंबर) रोजी ठीय्या मांडला होता.
या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांनी एक तपास पथक आरोपींना पकडण्यासाठी रवाना केले. पोलिसांच्या पथकाने कौशल्यपूर्वक तपास करून मोठ्या शिताफीने आरोपींना ताब्यात घेतले होते. पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांनी हे प्रकरण व्यवस्थित हाताळून सध्यातरी तृतीयपंथीयांमधील हा वाद मिटविला आहे. पोलीस प्रशासनाकडून संबंधित आरोपींवर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.