पालकांनो लक्ष द्या! आरटीई अंतर्गत मोफत प्रवेशासाठी अर्ज सुरू, जाणून घ्या संपूर्ण माहिती एका क्लिकवर…

पुणे : शिक्षण हक्क कायद्यांतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि वंचित घटकातील विद्यार्थ्यांसाठी राखीव असलेल्या 25 टक्के जागांच्या प्रवेश प्रक्रियेला महाराष्ट्र राज्य शिक्षण विभागाने सुरुवात केली आहे.

तसेच 17 फेब्रुवारी 2026 पासून ही प्रक्रिया सुरू असून पालकांना 10 मार्च 2026 पर्यंत अर्ज करता येणार आहेत. यंदा 1 किलोमीटर अंतराचा नियम आणि कागदपत्रे ऑनलाईन अपलोड करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि वंचित घटकातील विद्यार्थ्यांसाठी राखीव 25 टक्के जागांवर प्रवेश देण्यासाठी राज्य शिक्षण विभागाने प्रक्रिया सुरू केली आहे. शिक्षण हक्क कायदा अंतर्गत स्वयंअर्थसहाय्यित व विनाअनुदानित शाळांमध्ये प्रवेश ऑनलाईन पद्धतीने दिला जाणार आहे.

पालकांना https://student.maharashtra.gov.in/adm_portal या संकेतस्थळावर 17 फेब्रुवारी ते 10 मार्च 2026 दरम्यान अर्ज सादर करता येईल. शालेय शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी सुधारित मार्गदर्शक सूचना जाहीर केल्याची माहिती दिली आहे.
अर्ज करताना जन्मतारखेचा पुरावा, रहिवासी दाखला आणि आधार कार्ड अनिवार्य असून सर्व कागदपत्रे अंतिम तारखेपूर्वीची असणे आवश्यक आहे. पात्रतेनुसार वार्षिक उत्पन्न 1 लाख रुपयांपर्यंत असलेले आर्थिक दुर्बल घटक आणि अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, दिव्यांग, वि.जा.(अ), भटक्या जमाती (ब, क, ड), OBC, SBC, एचआयव्ही बाधित, कोविड कालावधीत (1 एप्रिल 2020 ते 31 मार्च 2022) पालक गमावलेली मुले तसेच अनाथ बालके वंचित गटात समाविष्ट आहेत. उत्पन्नाचा दाखला तहसीलदार दर्जाच्या अधिकाऱ्यांकडून असावा, जातीचा दाखला संबंधित अधिकाऱ्यांनी दिलेला असावा आणि जन्मनोंद ग्रामपंचायत किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेची असावी.
या प्रक्रियेत सर्व माध्यम व सर्व बोर्डाच्या अनुदानित व विनाअनुदानित शाळांचा समावेश आहे; मात्र अल्पसंख्यांक शाळा यातून वगळण्यात आल्या आहेत. पालकांना 2026-27 साठी केवळ एकदाच अर्ज करता येईल. घरापासून 1 किलोमीटर अंतरातील जास्तीत जास्त 10 शाळांचे पर्याय निवडण्याची सुविधा उपलब्ध आहे आणि त्या परिसरातील विद्यार्थ्यांना प्राधान्य दिले जाईल. शाळा निवडताना प्रत्यक्ष रस्त्याऐवजी ‘हवाई अंतर’ ग्राह्य धरले जाणार आहे.
निवडीची माहिती एसएमएसद्वारे मिळणार…
गुगल मॅपवर घराचे लोकेशन निश्चित करताना ‘रेड बलून’ जास्तीत जास्त पाच वेळा सेट करता येईल. अर्ज एकदा निश्चित केल्यानंतर लोकेशन बदलता येणार नाही. प्रवेश क्षमतेपेक्षा जास्त अर्ज आल्यास लॉटरी पद्धतीने निवड केली जाईल. निवडीची माहिती पालकांना एसएमएसद्वारे दिली जाईल; तसेच पोर्टलवरील ‘Application wise details’ विभागातही स्थिती तपासता येईल. निवड झाल्यानंतर ‘Allotment Letter’ ची प्रिंट काढून आवश्यक कागदपत्रांसह पडताळणी समितीकडे जाऊन प्रवेशाची पावती घ्यावी लागेल.