हगवणे कुटुंबाचा आणखी एक धक्कादायक कारनामा समोर, नेमकं प्रकरण काय?

पुणे : वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणानंतर संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरलेल्या हगवणे कुटुंबाचे आणखी एक प्रकरण समोर आले आहे. समोर आलेल्या माहितीनुसार हगवणे कुटुंबीयांनी चित्रपट क्षेत्रातही पैसा लावला होता, राजेंद्र हगवणे याचा पुतण्या संतोष हगवणे यांनी खुर्ची या मराठी चित्रपटाची निर्मिती केली होती.
मात्र या चित्रपटाचे दिग्दर्शक असलेले अविनाश खोचरे पाटलांचे लाखो रुपये थकवल्याचा आरोप आहे. आपल्याला धमकावण्यात आल्याचा आरोप देखील अविनाश पाटील यांनी केला आहे.
या प्रकरणात त्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे देखील तक्रार केली होती, तसेच पुणे पोलीस आयुक्त कार्यालयात देखील तक्रार केली होती. समोर आलेल्या माहितीनुसार या चित्रपटाचं पोस्टर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते लाँच झालं होतं.
संतोष हगवणे यांच्यावर चित्रपट निर्मितीच्या नावाखाली दिग्दर्शकाच्या मेहनतीची आणि आर्थिक गुंतवणुकीची फसवणूक केल्याचा आरोप आहे. अविनाश पाटील यांनी दावा केला आहे की, त्यांचे लाखो रुपये अजूनही थकीत असून, पैसे मागितल्यावर त्यांना धमकावण्यात आले. त्यांनी यासंबंधीची तक्रार मुख्यमंत्री कार्यालय, उपमुख्यमंत्री कार्यालय आणि पुणे पोलिसांकडे केली आहे.
दरम्यान, या प्रकरणामुळे वैष्णवी हगवणे प्रकरणाशी संबंधित कुटुंबावर आणखी संशयाची सावली पडली आहे. चित्रपट क्षेत्रात गुंतवणूक करून सामाजिक प्रतिष्ठा मिळवण्याचा प्रयत्न झाला असला तरी त्यामागे फसवणुकीचा आरोप गंभीर मानला जात आहे.