लाडक्या बहिणींना आणखी एक मोठा धक्का, १५०० रुपये नाही तर या महिलांना मिळणार ५०० रुपये?, महत्वाची माहिती आली समोर..
मुंबई : महाराष्ट्र सरकारची महत्त्वाकांक्षी योजना म्हणून ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना सध्या चर्चेत आहे. विधानसभा निवडणुकीनंतर मात्र या योजनेच्या लाभार्थ्यांची पडताळणी सुरू असतानाच, लाभार्थ्यांच्या संख्येत मोठी घट झाली आहे.
या योजनेंतर्गत दर महिन्याला लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये दीड हजार रुपये जमा करण्यात येतात. आतापर्यंत या योजनेचे एकूण सात हाफ्ते महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत. फेब्रुवारी महिन्याचा हाफ्ता देखील लवकरच जामा होण्याची शक्यता आहे.
दरम्यान लाडकी बहीण या योजनेचा लाभ घेण्यासाठी शासनाने काही निकष तयार केले आहेत, मात्र या निकषात बसत नसताना देखील अनेक महिलांकडून या योजनेचा लाभ घेतला जात असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे आता सरकारकडून अशा महिलांच्या अर्जाची पुन्हा एकदा पडताळणी करण्यात येणार आहे.
डिसेंबर २०२४ मध्ये २.४६ कोटी लाभार्थी १,५०० रुपयांचे लाभ घेत होते. जानेवारी २०२५ मध्ये ही संख्या २.४१ कोटींवर आली. ६५ वर्षांपेक्षा जास्त वयाचे साधारण १.५ लाख लाभार्थी या योजनेतून वगळण्यात आले. त्याची वयोमर्यादा बसत नाही असं कारण देऊन या लाभार्थ्यांचे अर्ज बाद करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. यावर आदिती तटकरे यांनी मात्र अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
संजय गांधी निराधार योजनेतील सुमारे २ लाख लाभार्थ्यांनाही वगळण्यात आलं आहे. संजय गांधी निराधार योजना विधवा, दिव्यांग, रुग्ण, निराश्रित आणि घटस्फोटित व्यक्तींसाठी आहे, ज्यांना दरमहा १,५०० रुपयांचं लाभ मिळत होता. ‘माझी लाडकी बहीण’ योजनेचे लाभार्थी इतर सरकारी योजनेचा लाभ घेऊ शकतात, पण दोन्ही योजनांमधील एकत्रित लाभ १, ५०० रुपयांपेक्षा जास्त नसावा, अशी अट आहे.
दरम्यान, दुसरीकडे ‘नमो शेतकरी महासन्मान योजना’ आणि ‘माझी लाडकी बहीण’ योजना या दोन्हीचा लाभ घेणाऱ्या ५-६ लाख लाभार्थ्यांचं मानधन कमी होऊ शकतं. ‘नमो शेतकरी महासन्मान योजने’त दरमहा १,०० रुपये मिळतात. त्यामुळे दोन्ही योजनांचा लाभ घेणाऱ्यांना ‘माझी लाडकी बहीण’ योजनेत फक्त ५०० रुपये मिळतील असे सांगितले जात आहे.