Anna Hazare : अरविंद केजरीवाल यांच्या अटकेनंतर अण्णा हजारे यांचे मोठे वक्तव्य, म्हणाले, सत्तेपुढे…
Anna Hazare : कथित मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी ईडीकडून दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यात आली आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने अरविंद केजरीवाल यांना अटकपूर्व जामीन देण्यास नकार दिला होता. त्यानंतर लागलीच ईडीने कारवाई करून त्यांना अटक केली आहे.
ज्यांच्यामुळे केजरीवाल मुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचू शकले, त्या अण्णा हजारे यांनी केजरीवालांच्या अटकेवर प्रतिक्रिया दिली आहे. अण्णा हजारे म्हणाले की, केजरीवाल यांच्यासारखा माणूस आधी माझ्यासोबत काम करायचा. तेव्हा आम्ही दारुविरोधात आवाज उठवायचो. परंतु आता मात्र ते दारु धोरण बनवत आहेत.
मला या गोष्टीचे खूपच दु:ख झाले आहे. परंतु करणार काय? सत्तेच्या पुढे शहाणपण चालत नाही. अण्णा पुढे म्हणाले की, दारु धोरण प्रकरणात अरविंद केजरीवाल यांना अटक झाली, हे सगळे त्यांच्या कृतीमुळे झाले आहे. त्यांनी ते सगळे केले नसते तर अटकेचा संबंधच नव्हता. आता जे होईल ते कायद्याच्या दृष्टीने होईल. अशी प्रतिक्रिया अण्णा हजारे यांनी दिली आहे. Anna Hazare
दिल्लीतील दारु घोटाळ्याप्रकरणी तब्बल १० समन्स दिल्यानंतर ईडीने अखेर अरविंद केजरीवाल यांना अटक केली. गुरुवारी रात्री उशिरा केजरीवाल यांच्यावर अटकेची कारवाई झाली. त्यानंतर केजरीवाल यांनी अटकेविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.
अरविंद केजरीवाल यांनी अटकेविरोधातली याचिका मागे घेतली आहे. खालच्या कोर्टात सुनावणी होणार असल्याने ही याचिका मागे घेतल्याचे केजरीवालांचे वकील अभिषेक मनू सिंघवी यांनी सांगितले आहे.