Anmol Bishnoi : मोठी बातमी! मुंबई पोलिसांना मोठे यश, लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक..
Anmol Bishnoi : गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोई याला पोलिसांनी अटक केली आहे. भारत सरकारने अनमोल याच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट काढले होते. अनमोलला आता भारतात आणले जाणार आहे.
काही दिवसांपूर्वी अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी अनमोल हा आपल्या देशात असल्याचे स्पष्ट केले होते. यानंतर मुंबई पोलिसांनी अनमोल बिश्नोईच्या प्रत्यार्पणाचा प्रस्ताव अमेरिकेला पाठविला होता. यानंतर ही कारवाई करण्यात आल्याचे समजते आहे.
मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रांचने स्पेशल मकोका कोर्टात याचिका दाखल केली होती. यात अनमोल बिश्नोईची प्रत्यार्पण प्रक्रिया सुरु करण्याचे म्हटले होते. अनमोल बिश्नोई हा सलमान खानच्या घराबाहेर फायरिंग आणि बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी आहे.
त्याच्यावर अन्य गुन्हेही नोंद आहेत. अनमोल बिश्नोईची माहिती देणाऱ्यास एनआयएने १० लाखांचा इनाम घोषित केला होता. एनआयएने देखील २०२२ मध्ये दाखल झालेल्या दोन गुन्ह्यांत आरोप पत्र दाखल केले आहे.
दरम्यान, बाबा सिद्दीकी हत्याप्रकरणी मुंबई पोलीस अनमोलचा शोध घेत आहेत. अनमोलनं अन्य आरोपी सुजित सुशील सिंहच्या माध्यमातून शस्त्र आणि आर्थिक मदत केल्याचा दावा मुंबई पोलिसांच्या तपासात करण्यात आला आहे.
अनमोलनं कथितरित्या सिद्दीकी आणि त्यांचा मुलगा झिशान यांचे फोटो स्नॅपचॅटद्वारे नेमबाजांना भाड्यानं देण्यासाठी पाठवले होते. खुनाच्या महिनाभरापूर्वी गोळीबार करणाऱ्यांनी परिसराचा शोध घेतला होता.
अनमोल बिष्णोईचं नाव इतरही अनेक हाय-प्रोफाईल प्रकरणांमध्ये असल्याचं समोर आलं आहे. पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येत मदत केल्याचा आणि बॉलिवूड सेलिब्रिटींवर हल्ल्याचा कट रचल्याचाही त्यांच्यावर आरोप आहे. बॉलिवूड स्टार सलमान खानच्या अपार्टमेंटबाहेर गोळीबार झाल्याची घटनाही घडली होती. यामध्येही अनमोलचाच हात असल्याचं बोललं जात आहे.